दक्षिण आफ्रिकेनं चार सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा 3 गडी राखून पराभव केला. यासह संघानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 124 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, यजमान दक्षिण आफ्रिकेनं 6 चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठलं. आफ्रिकेच्या विजयात ट्रिस्टन स्टब्स आणि गेराल्ड कोएत्झी यांनी महत्त्वाचं योगदान दिलं.
या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला केवळ 4 धावा करता आल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. तर कर्णधार सूर्यकुमार यादवच्या बॅटमधूनही केवळ 4 धावा निघाल्या. तिलक वर्माची सुरुवात चांगली झाली, पण तो 20 धावाच करू शकला. भारताकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक 39 धावा केल्या. मात्र यासाठी त्यानं 45 चेंडू खर्च केले.
125 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही चांगली झाली नाही. 44 धावा होईपर्यंत आफ्रिकन संघानं 3 विकेट गमावल्या होत्या. 86 धावा होईपर्यंत संघाचे 7 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. येथून ट्रिस्टन स्टब्स आणि जेराल्ड कोएत्झी यांच्यातल्या नाबाद 42 धावांच्या भागीदारीनं आफ्रिकन संघाचा विजय निश्चित केला. कोएत्झी एक गोलंदाज आहे, मात्र शेवटच्या शटकांमध्ये त्यानं 9 चेंडूत 19 धावांची विस्फोटक खेळी खेळून संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. तर ट्रिस्टन स्टब्सनं 41 चेंडूत 47 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.
फिरकीपटू वरुण चक्रवर्तीनं या सामन्यात 4 षटकांत फक्त 17 धावा दिल्या आणि 5 बळी घेतले. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एका डावात 5 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो आता पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोनदा अशी कामगिरी केली होती. तर युझवेंद्र चहल आणि दीपक चहर यांनी टी20 सामन्यात प्रत्येकी एकदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. दुर्दैवानं वरुणची ही मेहनत वाया गेली.
हेही वाचा –
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी भारताला मोठा झटका! रोहित शर्मा बाहेर
IND vs SA; भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 125 धावांचे आव्हान!
बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाचे हे 5 खेळाडू ठरू शकतात भारतासाठी डोकेदुखी