---Advertisement---

Boxing Day Test । दिग्गजांनी भरलेल्या टीम इंडियावर मान खाली घालण्याची वेळ! डाव आणि 32 धावांनी तिसऱ्याच दिवशी गमावला सामना

On: गुरूवार, डिसेंबर 28, 2023 8:44 PM
South africa
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघ पूर्णपणे अपयशी ठरला. सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कवर दक्षिण आफ्रिकेने हा सामना एक डाव आणि 32 धावांनी जिंकला. दुसऱ्या डावात भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठी विराट कोहली प्रयत्न करत होता. विराटला यादरम्यान कोणत्याच फलंदाजाची साथ मिळाली नाही. परिणामी दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला.

पहिल्या डावात भारतीय संघाने 67.4 षटकांमध्ये 245 धावां केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने 108.4 षटकांमध्ये 408 धावांपर्यंत मजल मारली आणि 163 धावांची आघाडी मिळवली. भारतीय संघ मात्र दुसऱ्या डावात अवघ्या 131 धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात त्यांचे वेगवान गोलंदाज आणि माजी कर्णधार डीन एल्गर यांचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले.

गुरुवारी दक्षिण आफ्रिका संघ फलंदाजी आल्यानंतर डीन एल्गर 140* धावांपासून पुढे खेळला. त्याचे द्विशतक होणार, असे वाटत असतानाच शार्दुल ठाकूर याच्या चेंडूवर त्याने यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातात झेल दिला आणि विकेट गमावली. एल्गरने या सामन्यात 185 धावांची सर्वोत्तम खेळी केली. त्याचसोबत मार्को यान्सेन यानेही 84 धावांची खेळी केली आणि पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला 408 धावांपर्यंत पोहोचवले.

भारताला दुसऱ्यांदा फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर संघातील फलंदाजांकडून संयमी खेळीची अपेक्षा होती. पण पहिल्या डावाप्रमाणेच या डावातही वरची आणि मधली फळी अपयशी ठरली. एकटा विराट कोहली अर्धशतक करू शकला. विराटने दुसऱ्या डावात 82 चेंडूत 76 धावा साकारल्या. पण शतक पूर्ण करण्याआधीच संघाची 10वी विकेट बनला. दुसऱ्या डावात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल अनुक्रमे शुन्य आणि पाच धावा करून बाद झाले. शुबमन गिल याने 26, तर श्रेयस अय्यरने 6 धावा करून विकेट गमावली. पहिल्या डावात शतक करणारा केएल राहुल दुसऱ्या डावात मात्र 4 धावांवर बाद झाला. रविचंद्रन अश्विन यानेही गोल्डन डकवर (0) विकेट गमावली. शार्दुल ठाकूर 2, जसप्रीत बुमराह 0 आणि मोहम्मद सिराज 4 धावा करून तंबूत परतले.

दक्षिण आफ्रिकेसाठी दुसऱ्या डावात नांद्रे बर्गर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मार्को यान्सेन याने 3, तर कागिसो रबाडा याने दोन विकेट्स नावावर केल्या. (South Africa defeated India by innings & 32 runs in the first Test.)

पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ –
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.

भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

महत्वाच्या बातम्या – 
फ्लाईंग कॅच! सामन्याच्या पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलिया झटका, स्नेह राणाच्या चपळाईमुळे एलिसा हिली तंबूत
‘आता बास कर…’, मॅक्सवेलने षटकारांचा पाऊस पाडताच BBLनेही जोडले हात; पोस्ट Viral

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---