केपटाऊन। भारताने प्रथम फलंदाजी करताना तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेकडून ज्युनिअर डालाने ४ षटकात ३५ धावा देत ३ विकेट्स घेत महत्वाची कामगिरी बजावली. भारताकडून शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी चांगली लढत दिली.
भारताची सुरुवात मागील काही सामान्यांप्रमाणे आजही खराब झाली. सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आज ११ धावांवर बाद झाला. त्याला ज्युनिअर डालाने पायचीत बाद केले. त्यानंतर शिखर धवन आणि सुरेश रैनाने चांगला डाव सांभाळत ६५ धावांची भागीदारी रचली. पण ताब्राईझ शम्सीने आक्रमक खेळणाऱ्या रैनाला बाद करत ही जोडी फोडली.
रैनाने आज २७ चेंडूत ४३ धावा करताना ५ चौकार आणि १ षटकार मारला. रैना बाद झाल्यानंतर लागेचच काही वेळात मागच्या सामन्यात नाबाद अर्धशतक करणाऱ्या मनीष पांडेने(१३) विकेट गमावली. तर त्याच्यापाठोपाठ शिखरही ४० चेंडूत ४७ धावा करून धावबाद झाला.
त्यामुळे भारताची अवस्था १५.१ षटकात ४ बाद १२६ धावा अशी झाली. त्यानंतरही भारताकडून बाकी फलंदाजांनी विशेष काही केले नाही. नेहमीप्रमाणे एमएस धोनीने(१२) अखेरचे षटक बाकी असताना १८.२ षटकात आपली विकेट गमावली. त्यालाही डालाने बाद केले.
यानंतर हार्दिक पंड्या(२१) आणि दिनेश कार्तिक(१३) हे दोघेही अखेरच्या षटकात बाद झाले. त्यानंतर भुवनेश्वर कुमार(३*) आणि अक्षर पटेल(१*) यांनी भारताला १७१ धावांचा टप्पा गाठून दिला.
दक्षिण आफ्रिकेकडून ज्युनिअर डाला(३/३५), ताब्राईझ शम्सी(१/३१) आणि ख्रिस मॉरिस(२/४३) यांनी विकेट्स घेत भारताला २० षटकात ७ बाद १७२ धावांवर रोखले.
आज भारतीय संघ नियमित कर्णधार विराट कोहलीशिवाय मैदानात उतरले आहेत. विराट आज दुखापतीमुळे संघाबाहेर असून रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करत आहे.