जोहान्सबर्ग। भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर पहिल्या टी २० सामन्यात विजयासाठी २०४ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शानदार आक्रमक अर्धशतकी खेळी केली.
भारताने सुरुवात आक्रमक केली होती. रोहितने सुरवातीपासूनच स्फोटक खेळ केला पण तो ९ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर आज भारतीय संघात पुनरागमन केलेला सुरेश रैनाही आक्रमक खेळत होता. परंतु त्यानेही आक्रमक खेळायच्या नादात आपली विकेट गमावली. त्याने ७ चेंडूत १५ धावांची छोटेखानी स्फोटक खेळी केली.
रोहित आणि रैना बाद झाल्यावर शिखर आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीने डाव सांभाळत ५९ धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. शिखर त्याच्या आक्रमक अंदाजात खेळत होता. त्यामुळे त्याला विराट भक्कम साथ देत होता. पण विराटला २० चेंडूत २६ धावांवर असताना ताब्राईझ शम्सीने पायचीत बाद करत ही जोडी तोडली.
त्यानंतर मनीष पांडेने शिखरला साथ देताना चांगला खेळ केला. मनीष आणि शिखरची भागीदारी रंगात असतानाच अँडिल फेहलूकवयोने शिखरला बाद केले. शिखरने ३९ चेंडूत ७२ धावांची आक्रमक खेळी केली. यात त्याच्या १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. शिखरचे हे आंतराष्ट्रीय टी २० तील चौथे अर्धशतक आहे.
यानंतर अखेरच्या काही षटकात मनीष पांडे आणि एम एस धोनीने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. पण धोनी ११ चेंडूत १६ धावा करून बाद झाला.
त्यानंतर हार्दिक पंड्या आणि मनीष पांडेने अखेरच्या षटकात स्फोटक फलंदाजी करत भारताला २०३ धावांचा आकडा गाठून दिला. मनीषने आज २७ चेंडूत २९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली तर हार्दिकने ७ चेंडूत १३ धावांची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेकडून जुनिअर डाला(२/४७), ख्रिस मॉरिस (१/३९), ताब्राईझ शम्सी (१/३७) आणि अँडिल फेहलूकवयो(१/१६) यांनी विकेट्स घेतल्या.






