जोहान्सबर्ग। आजपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना असणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने आधीच २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
त्यामुळे भारताला या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश टाळण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. पहिल्या दोनही सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली होती परंतु फलंदाजांकडून हाराकिरी पाहायला मिळाली होती. भारतीय संघाला या दोन्ही सामन्यात विजयाची संधी होती मात्र मोक्याच्या वेळेला फलंदाजांनी आपल्या विकेट बहाल केल्याने पराभव स्वीकारावा लागला होता.
दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेले शतक ही भारतासाठी जमेची बाजू होती. परंतु बाकी फलंदाजांचा फॉर्म ही मात्र विराटसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच पहिल्या दोन्ही सामन्यांसाठी उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेला बाहेर बसवल्यामुळे विराट कोहलीवर सगळीकडून टीका होत आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणेला संधी मिळते का हे पाहावे लागेल.
तसेच पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केलेल्या भुवनेश्वर कुमारलाही दुसऱ्या कसोटीत संघाबाहेर बसावे लागले होते. यामुळे त्याच्याही बाबतीत विराट काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
याबरोबरच कसोटी संघातील नियमित यष्टीरक्षक वृद्धिमान सहा दुखापतीमुळे बाहेर गेल्यामुळे त्याच्या ऐवजी दुसऱ्या सामन्यात पार्थिव पटेलला संधी देण्यात आली होती. पण त्यानेही या सामन्यात काही खास केले नाही आणि त्याच्याकडून झेलही सुटले, त्यामुळे सहाऐवजी संघात दाखल झालेल्या दिनेश कार्तिकला तिसऱ्या कसोटीसाठी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
असे असले तरी आजपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा संघ चांगली कामगिरी करून भारताला व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न करेल तर भारताला प्रतिष्ठा राखण्यासाठी चांगली लढत द्यावी लागेल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होईल.