Australia vs South Africa WTC Final 2025: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात 2025ची आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळली गेली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. संघाने ‘चोकर्स’चा टॅग हटवत 27 वर्षांनंतर आयसीसी ट्राॅफीवर आपले नाव कोरले. (South Africa World Test Champions)
2025च्या WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 282 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे टेंबा बावुमाच्या संघाने अवघ्या 5 विकेट्स गमावून सहज गाठले आणि इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्करमने 207 चेंडूत 136 धावांची सामना-विजयी (Match Winning) खेळी केली. याशिवाय कर्णधार टेंबा बावुमाने 134 चेंडूत 66 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
विजेतेपदाच्या या सामन्यात 282 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर रायन रिकल्टन (Rayaan Richelton) फक्त 6 धावा करून बाद झाला. यानंतर वियान मुल्डर (Wiaan Mulder) सुद्धा 50 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 27 धावा काढून तंबूत परतला.
70 धावांत 2 गडी बाद झाल्यानंतर एडन मार्करम आणि टेंबा बावुमा मैदानात भक्कमपणे उभे राहिले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 147 धावांची जबरदस्त भागीदारी केली. बावुमा 134 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 66 धावा करून बाद झाला, पण मार्करम मैदानात टिकून राहिला. मार्करम आपल्या संघाचा विजय निश्चित करूनच बाद झाला. त्याने 207 चेंडूत 136 धावांची सामना-विजयी खेळी केली. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 14 चौकार निघाले. जेव्हा मार्करम बाद झाला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी फक्त 6 धावांची गरज होती.
संपूर्ण सामन्याचा विचार केल्यास, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात 212 धावा केल्या होत्या. कांगारूंसाठी स्टीव्ह स्मिथने पहिल्या डावात सर्वाधिक 66 धावा केल्या, तर दक्षिण आफ्रिकेसाठी कागिसो रबाडाने 5 विकेट्स घेतले. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या पहिल्या डावात केवळ 138 धावांत गारद झाला. यावेळी पॅट कमिन्सने 6 विकेट्स घेतल्या.
अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 74 धावांची आघाडी घेतली, पण दुसऱ्या डावात कांगारू फलंदाज पुन्हा गडगडले. ऑस्ट्रेलियाने यावेळी 207 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर 282 धावांचे लक्ष्य ठेवले. दक्षिण आफ्रिकेसाठी यावेळी एडन मार्करमने 136 धावांची सामना-विजयी खेळी केली. 27 वर्षांनंतर आफ्रिकेने आयसीसी (ICC) विजेतेपद जिंकले.






