सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी २० सामन्यात भारतावर ६ विकेट्सने विजय मिळवून ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. ही मालिका १-१ अशी बरोबरीची झाली असून आता तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.
आज दक्षिण आफ्रिकेकडून प्रभारी कर्णधार जेपी ड्युमिनी आणि हेन्रिक क्लासेन या दोघानीं अर्धशतके करून दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.
भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी १८९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने त्यांचा सलामीवीर जेजे स्मट्सची(२) विकेट लवकर गमावली. त्यानंतर लगेचच रिझा हेन्ड्रिक्सही २६ धावा करून बाद झाला.
त्यानंतर मात्र प्रभारी कर्णधार जेपी ड्युमिनी आणि हेन्रिक क्लासेनने अर्धशतकी खेळी करताना तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचली . जेपी ड्युमिनीने ४० चेंडूत नाबाद ६४ धावांची अर्धशतकी खेळी करताना ४ चौकार आणि ३ षटकार मारले. तर क्लासेनने स्पोटक खेळी करताना ३० चेंडूत ७ षटकार आणि ३ चौकारांच्या साहाय्याने ६९ धावा केल्या. पण या दोघांनीही महत्वपूर्ण खेळी केल्याने दक्षिण आफ्रिका विजयाच्या समीप पोहोचली.
क्लासेन बाद झाल्यावर लगेचच डेव्हिड मिलरचीही(५) विकेट गेली. पण त्यानंतर फरहान बेहार्डीनने(१६*) कर्णधार ड्युमिनीची उत्तम साथ देताना दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर या दोघांनी शिक्कामोर्तब केले.
भारताकडून जयदेव उनाडकट (२/४२), शार्दूल ठाकूर(१/३१) आणि हार्दिक पंड्या(१/३१) यांनी विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी भारताने मनीष पांडे आणि एमएस धोनीच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकात ४ बाद १८८ धावा केल्या. भारताची डावाची सुरुवात खराब झाली होती सलामीवीर रोहित शर्मा(०) मागील काही सामन्यांप्रमाणे आजही लवकर बाद झाला.
त्यानंतर मागील सामन्यात अर्धशतक करणारा शिखर धवन(२४) आणि सुरेश रैनाने(३०) थोडीफार लढत देण्याचा प्रयन्त केला. पण या दोघांनीही खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर आपल्या विकेट्स गमावल्या. त्याचबरोबर अफलातून फॉर्ममध्ये असणाऱ्या कर्णधार विराट कोहलीलाही(१) आज विशेष काही करता आले नाही.
त्यानंतर अखेरच्या काही षटकात पांडे आणि धोनीने आक्रमक खेळताना ९८ धावांची नाबाद भागीदारी रचली. या दोघांनीही आणखी पडझड होऊ न देता अर्धशतकी खेळी केल्या.
पांडेने ६ चौकार आणि ३ षटकार मारताना ४८ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या. तर धोनीने २८ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी करताना ४ चौकार आणि ३ षटकार खेचले. या दोघांचेही हे आंतराष्ट्रीय टी २० तील दुसरे अर्धशतक आहे.
आज दक्षिण आफ्रिकेकडून ज्युनिअर डाला(२/२८), अँडिल फेहलूकवयो(१/१३) आणि जेपी ड्युमिनी (१/१५) यांनी विकेट्स घेतल्या.






