दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका थान्या वूर (Thanja Vuur) सध्या चर्चेत आहे. कारणही खास आहे! महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर तिने भारतीय संघाचे कौतुक करत आपल्या देशातील क्रिकेटपटूंवर आणि चाहत्यांवर संताप व्यक्त केला आहे.
थान्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं, “भारत, तू या विजयाला पूर्णपणे पात्र आहेस. तुम्ही हा सामना जिंकलात कारण तुमचा संघ, तुमचे चाहते आणि तुमचे माजी खेळाडू सर्वांनी मनापासून पाठिंबा दिला.” ती पुढे म्हणाली, “भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर भावना आहे. ते लोक हा खेळ जगतात. नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत क्रिकेटचं नाव घेतात.”
तिने भारतीय चाहत्यांच्या उर्जेचं आणि एकतेचं कौतुक केलं. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण सारखे दिग्गज महिला संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते, हे विशेषतः तीने अधोरेखित केलं.
पण याच वेळी थान्याने आपल्या देशातील उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, “आमच्या दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना मात्र असं काहीच पाठबळ नव्हतं. आमचे माजी खेळाडू कुठे होते? हा विश्वचषक त्यांच्या दृष्टीने पुरेसा मोठा नव्हता का?”
तिने तिखट प्रश्न उपस्थित करत म्हटलं, “ते हाच संदेश द्यायचा प्रयत्न करत होते का, की आमचा संघ जिंकू शकत नाही?”
फायनलमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवत ऐतिहासिक विजय मिळवला. दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांच्या अर्धशतकांनी आणि अचूक गोलंदाजीतून भारताने पहिला आयसीसी महिला विश्वचषक जिंकला.






