स्पेननं चमकदार कामगिरी करत विक्रमी चौथ्यांदा युरो कप जिंकला आहे. 14 जुलै (रविवार) रोजी बर्लिन येथे खेळल्या गेलेल्या युरो 2024 च्या अंतिम सामन्यात स्पेननं इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. इंग्लंडचा युरो स्पर्धेच्या सलग दुसऱ्या अंतिम सामन्यात पराभव झाला आहे. युरो 2020 च्या अंतिम सामन्यात इटलीनं इंग्लंडचा पराभव करत विजेतेपद पटकावलं होतं.
स्पेननं यापूर्वी 1964, 2008 आणि 2012 मध्ये युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली होती. स्पेन हा युरो कपमधील सर्वात यशस्वी संघ आहे. तर जर्मनी तीन विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडबद्दल बोलायचं झालं तर, त्यांना या चॅम्पियनशिपच्या 66 वर्षांच्या इतिहासात एकदाही चॅम्पियन बनता आलेलं नाही.
अंतिम सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नाही. मात्र, या दरम्यान स्पॅनिश संघाकडे 66 टक्के चेंडू होता. पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत इंग्लंडच्या फिल फोडेनला गोल करण्याची सुवर्णसंधी होती, पण स्पेनचा गोलरक्षक युनाई सिमॉननं शानदार बचाव केला.
दुसरा हाफ ॲक्शननं भरलेला होता. सामन्याच्या 47व्या मिनिटाला निकोलस विल्यम्सनं लमिन यामलच्या उत्कृष्ट क्रॉसवर गोल करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. खेळाच्या 73व्या मिनिटाला बदली खेळाडू कोल पाल्मरनं ज्युड बेलिंगहॅमच्या क्रॉसवर गोल करून इंग्लंडला बरोबरी साधून दिली. 86व्या मिनिटाला स्पेनचा बदली खेळाडू मिकेल ओयारझाबाल यानं गोल केला, जो सामन्यातील निर्णायक गोल ठरला. या गोलसाठी मार्क कुकुरेलानं त्याला मदत केली.
स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात इंग्लंडनं नेदरलँड्सचा 2-1 ने पराभव केला होता. दुसरीकडे, स्पेननं उपांत्या फेरीत फ्रान्सचा 2-1 असा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. युरो 2024 चे आयोजन जर्मनीनं केलं होतं. मात्र यजमान जर्मनीचा संघ उपांत्यपूर्व फेरीत स्पेनकडून पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
विम्बल्डनमध्ये कार्लोस अल्कारेजचं तुफान! दिग्गज नोव्हाक जोकोविचचं स्वप्न पुन्हा भंगलं
बार्बोरा क्रेजिकोव्हा बनली विम्बल्डनची नवीन चॅम्पियन….इटलीची खेळाडू इतिहास रचण्यापासून चुकली
ऑलिम्पिकमध्ये फक्त 5 रिंग का असतात? रिंगच्या रंगांचा अर्थ काय? सर्वकाही जाणून घ्या