इंग्लिश क्रिकेट बोर्डानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड सर्वात शिस्तप्रिय क्रिकेट बोर्ड समजले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला सामना खेळणारा ऑस्ट्रेलियन संघ कायम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज्य करत आला आहे. ऑस्ट्रेलियाने जागतिक क्रिकेटला दर्जेदार क्रिकेटपटू भरभरून दिले आहेत. ज्यांना आतापर्यंतचे सर्वोत्तम क्रिकेटपटू संबोधले जाते, ते सर डॉन ब्रॅडमन हेदेखील ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू होते. नंतरच्या काळात, ग्रेग चॅपल, स्टीव वॉ, रिकी पॉंटिंग ते आत्ताचा स्टीव स्मिथ हे सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वकालीन महान क्रिकेटपटू ठरले आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या १४४ वर्षाच्या इतिहासात फक्त एक असा खेळाडू पुढे आला जो, एकही प्रथमश्रेणी सामना न खेळता, सरळ आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्या खेळाडूने आपल्या कामगिरीने फक्त ऑस्ट्रेलियनच नव्हेतर, जगभरातील क्रिकेटप्रेमींना आनंद देण्याचे काम केले आहे. आपल्या विस्फोटक फलंदाजीने जगभरातील गोलंदाजांची धुलाई करणारा हा फलंदाज म्हणजे डेविड वॉर्नर.
गरिबीत काढले दिवस
डेविड वॉर्नरचा जन्म २७ ऑक्टोबर १९८६ रोजी सिडनीमध्ये हावर्ड आणि लॉरेन वॉर्नर यांच्या घरी झाला. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. वॉर्नरला आपल्या लहानपणी खेळणी आणि आवडत्या टॉफीज कधीच घेता आल्या नाहीत. वॉर्नरला या गोष्टीचे खूप वाईट वाटे. शेवटी, परिस्थिती समजून त्यानेच, असल्या चैनीच्या वस्तू मागणे बंद केले. अगदी कमी वयातच त्याने समजून घेतले होते की, आयुष्यात काहीही मिळवायचे असेल तर त्यासाठी मेहनत करावीच लागेल.
दोन्ही हाताने करू शकतो फलंदाजी
वयाच्या सातव्या वर्षी वॉर्नर एका स्थानिक क्रिकेट क्लबच्या आठ वर्षाखालील संघात खेळू लागला. जन्मजात उजव्या हाताने सर्व कामे करणारा वॉर्नर फलंदाजी मात्र डाव्या हाताने करत असे. त्याने मारलेले चेंडू जास्त लांबवर जात नसल्याने, प्रशिक्षकांनी त्याला उजव्या हाताने फलंदाजी करायला लावली. उजव्या हाताने फलंदाजी करताना, तितकेसे यश न मिळाल्याने त्याच्या आईने त्याला पुन्हा डावखुऱ्या हाताने फलंदाजी करण्याचा सल्ला दिला. आईचा सल्ला मानून त्याने, पुन्हा डाव्या हाताने फलंदाजी करत तुफानी ८० धावांची खेळी केली. तेव्हापासून तो कायमचा डावखुरा फलंदाज बनला.
लहान वयात दुकानात केले काम
वॉर्नर जसा मोठा होऊ लागला, तशी इतर मुलांप्रमाणे त्याला पॉकेटमनीची गरज भासू लागली. तेव्हा, वडिलांनी त्याला पॉकेटमनी देण्यास नकार दिला. स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी त्याने एका दुकानात काम करायला सुरुवात केली. दुकानातील सर्व वस्तू कपाटात व्यवस्थितपणे लावून ठेवणे, हे त्याचे काम होते. अगदी रात्री एक-दोन वाजेपर्यंत तो ते काम करत. एका तासासाठी १२ ऑस्ट्रेलियन डॉलर ही त्याची कमाई होती.
क्रिकेटपटू म्हणून कमवू लागला नाव
वयाच्या पंधराव्या वर्षी सिडनी कोस्टल क्रिकेट क्लबसाठी त्याने धावांचा रतीब घातला. ईस्टर्न सबर्बसाठी ग्रेड ए क्रिकेट खेळण्यासाठी त्याने सुरुवात केली. ईस्टर्न सबर्ब संघासोबत काही चांगल्या खेळ्या केल्यानंतर, त्याची निवड ऑस्ट्रेलियाच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात झाली. लवकरच त्याने, आपल्या राज्याचे देखील मर्यादित षटकांच्या सामन्यात प्रतिनिधित्व केले.
पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत रचला इतिहास
नोव्हेंबर २००८ मध्ये अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करताना त्याने न्यू साउथ वेल्स ब्लूसाठी आक्रमक १६५ धावांची खेळी केली. याच खेळीने त्याच्यासाठी राष्ट्रीय संघाचे दरवाजे खुले केले. ११ जानेवारी २००९ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० सामन्यात वॉर्नरने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. वॉर्नर या सामन्यावेळी मैदानात उतरला त्यावेळी त्याने इतिहास रचला होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या १३२ वर्षाच्या इतिहासात वॉर्नर पहिला असा खेळाडू होता, जो एकही प्रथमश्रेणी सामना न खेळता आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. पहिल्याच सामन्यात त्याने ४३ चेंडूत ८९ धावांची विस्फोटक खेळी करत सर्वांना आवाक् केले होते. पहिली दोन वर्षे तो ऑस्ट्रेलियाच्या टी२० व एकदिवसीय संघाच्या आत-बाहेर होत राहिला. मात्र, त्याला मिळालेल्या सर्व संधीचा तो पूर्ण फायदा घेत होता.
वॉर्नरच्या कारकीर्दीने २०११ मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर चांगलाच वेग घेतला. न्यूझीलंडविरुद्धच्या आपल्या दुसऱ्याच कसोटीच्या चौथ्या डावात, त्याने शतकी खेळी केली. या खेळी दरम्यान सलामीला येत, अखेरपर्यंत नाबाद राहण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला. अगदी पुढच्याच महिन्यात, भारताविरुद्ध पर्थ कसोटीत अवघ्या ६९ चेंडूत शतक झळकावत याने विश्वविक्रम नोंदविला होता. वॉर्नर कसोटी क्रिकेटमध्ये, चाहत्यांना टी२० क्रिकेटचे मनोरंजन करत असल्याने, जगभरातील चाहत्यांना तो आवडू लागला. वॉर्नर तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिल्या पसंतीचा सलामीवीर बनला होता. २०१५ विश्र्वचषक, २०१६ ऍशेज मालिका जिंकवून देण्यात वॉर्नरने ऑस्ट्रेलियाला मोलाची मदत केली होती.
विवादांशी राहिले आहे खास नाते
वॉर्नर आपल्या आतापर्यंतच्या १२ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विवादांमध्ये राहिला आहे. त्याने २०१३ मध्ये इंग्लंडचा फलंदाज जो रूटला एका पबबाहेर मारहाण केल्याचे समोर आले होते. २०१८ च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी दरम्यान तो क्विंटन डी कॉकला मारण्यासाठी धावला होता. यापूर्वीही, भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात त्याची रोहित शर्मासोबत शाब्दिक चकमक उडाली होती. न्यूझीलंडचे माजी कर्णधार राहिलेल्या मार्टिन क्रो यांनी, वॉर्नरला क्रिकेट इतिहासातील सर्वात भांडखोर खेळाडू म्हटले होते.
बॉल टेम्परिंग प्रकरणाने झाली नाचक्की
ऑस्ट्रेलियन क्रिकेटला आत्तापर्यंत सर्वात कलंकित केलेल्या, बॉल टेम्परिंग प्रकरणात वॉर्नरचा सहभाग होता. २०१८ च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाउन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बॅनक्रॉफ्ट हा ‘सॅंडपेपर’ ने चेंडू घासत असल्याचे दिसले. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेविड वॉर्नर व बॅनक्रॉफ्ट यांना दोषी समजून, एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. याचसोबत, वॉर्नरला आजीवन ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करण्यास मनाई करण्यात आली.
निलंबनानंतर केले दमदार पुनरागमन
‘बॉल टेम्परिंग’ प्रकरणामुळे लादलेली बंदी उठल्यानंतर त्याने २०१९ आयपीएलमध्ये पुनरागमन केले. त्याच हंगामात त्याने तिसऱ्यांदा ऑरेंज कॅप जिंकत, आपण पूर्ण फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले. आयपीएल पाठोपाठ, इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने आपला फॉर्म कायम राखला. विश्वचषकात १० सामने खेळत, वॉर्नरने तीन शतकांच्या सहाय्याने ६४७ धावा काढल्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा बनविणाऱ्या रोहित शर्मापेक्षा त्याने अवघी एक धाव कमी काढली होती. विश्वचषकानंतरच्या ऍशेज मालिकेत सुद्धा त्याची बॅट तळपली. पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेत तर त्याने ३३५ धावांची त्रिशतकी खेळी केली.
आयपीएलचा सुपरस्टार
जगातील सर्वोत्कृष्ट टी२० लीग असलेल्या, आयपीएलमध्ये वॉर्नर दुसऱ्या हंगामापासून खेळत आहे. २०१३ पर्यत त्याने दिल्ली डेअरडेविल्सचे प्रतिनिधित्व केले होते. दिल्लीसाठी त्याची कामगिरी संमिश्र राहिली. २०१४ पासून सनरायझर्स हैदराबादसाठी खेळायला सुरुवात केल्यानंतर त्याला कर्णधार म्हणून ओळख मिळाली. आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर त्याने २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादला पहिले आयपीएल विजेतेपद मिळवून दिले. वॉर्नरने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. २०१५, २०१७ व २०१९ अशी तीन वर्ष ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर सजली. २०२० आयपीएल दरम्यान त्याने ५,००० आयपीएल धावा बनवणारा पहिला विदेशी खेळाडू होण्याचा मान मिळवला.
क्रिकेट इतिहासातील सर्वात आक्रमक फलंदाजांपैकी एक असलेल्या वॉर्नरने, ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील वर्षातील सर्वात्तम खेळाडूला देण्यात येणारे ‘ऍलन बॉर्डर मेडल’ त्याने तीन वेळा पटकाविले आहे.
अत्यंत मेहनतीने संघर्ष करून नाव बनवलेला डेविड वॉर्नर, वादग्रस्त ठरला असला तरी जगभरात त्याचे चाहते कमी झाले नाहीत. आयपीएलमूळे, त्याला भारतात खूप प्रेम मिळते. तो स्वतः देखील भारताला आपले दुसरे घर मानतो. आपल्या तुफानी फटकेबाजीने क्रिकेट चाहत्यांना आनंद देणारा वॉर्नर, अशीच गोलंदाजांची पिसे काढेल यात शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: कसोटी सामन्याच्या पहिल्या षटकात हॅट्रिक घेणारा एकमेव अवलिया, पाहा व्हिडीओ
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बावनकशी सोनं