आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होऊन आता, १४० पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. आशियामध्ये ‘इंग्रजांचा खेळ’ म्हणून, हिणवल्या गेलेल्या क्रिकेटचे सर्वाधिक चाहते आज भारतीय उपखंडातच आहेत. क्रिकेटने आजवर अनेक खेळाडूंना मोठे केले. कोणाला देवाचा दर्जा दिला गेला, तर कोणी क्रिकेटचे ‘डॉन’ बनले. या क्रिकेटच्या मैदानावर जितके खेळाडू खेळले, तितकेच विक्रम देखील बनत गेले. काही विक्रम बनले, तर काही तुटले. मात्र, यादरम्यान असे काही विश्वविक्रम रचले गेले की, ज्यांची बरोबरी होऊ शकते, मात्र ते तोडले जाऊ शकत नाहीत.
क्रिकेटमधील अशाच, विक्रमांपैकी एक विक्रम म्हणजे कसोटीच्या एका डावात विरोधी संघातील सर्वच्या सर्व म्हणजेच १० गडी बाद करण्याचा विक्रम. ३१ जूलै १९५६ ला इंग्लंडचे महान फिरकीपटू जिम लेकर यांनी ऑस्ट्रेलियाचे सर्व दहा गडी एकाच डावात बाद करण्याचा पराक्रम केला. हा विक्रम, भविष्यात कोणी मोडणे शक्यच नव्हते. त्यामुळे या विक्रमाची फक्त बरोबरी केली जाऊ शकत होती. लेकर यांच्या या विक्रमाची बरोबरी करण्याचे सौभाग्य लाभले ते एका भारतीय फिरकीपटूला. जवळपास ३३ वर्षानंतर, लेकर यांच्या या पराक्रमाची बरोबरी केली ती, भारताचा दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे याने. आज, आपण अनिल कुंबळे याच्या ‘त्या’ ऐतिहासिक क्षणांची आठवण ताजी करूया.
एका तपानंतर ‘भारत-पाकिस्तान’ मालिका खेळली जाणार होती
भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या राजकीय संघर्षामुळे उभय देशांत क्रिकेटचे सामने अत्यंत कमी होत. पाकिस्तान संघाने भारतभूमीवरील आपली शेवटची कसोटी १९८७ मध्ये खेळली होती. जवळपास १२ वर्षानंतर, पाकिस्तान संघ १९९९ मध्ये दोन कसोटी खेळण्यासाठी भारतात येणार होता. मालिकेची घोषणा झाली आणि दोन्ही कसोटी अनुक्रमे चेन्नई व दिल्ली येथे आयोजित करण्याचे ठरले. मालिकेची घोषणा होताच, शिवसेनेने मालिकेविरोधात तीव्र निदर्शने केली. शिवसेनेच्या दिल्लीतील कार्यकर्त्यांनी एक महिना अगोदरच सामन्याचे नियोजित मैदान असलेल्या, फिरोजशहा कोटला मैदानाची खेळपट्टी उखडून टाकली. बीसीसीआयने स्पष्ट केले की, सामन्यापूर्वी खेळपट्टी तयार झाली असेल व सामना नियोजित वेळेतच होईल.
पहिली कसोटी पाकिस्तानच्या नावे
क्रिकेटप्रेमी या मालिकेसाठी खूप आतुर होते. अखेरीस, २८ जानेवारी रोजी मालिकेतील पहिली कसोटी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर सुरू झाली. एका तपानंतर भारतात आलेल्या, पाकिस्तान संघाने जबरदस्त सांघिक कामगिरी करत भारताला पहिल्याच सामन्यात लोळवले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात, भारत २७१ धावांचे आव्हान पूर्ण करण्यात १२ धावांनी कमी पडला. सचिन तेंडूलकरचे शतक व्यर्थ गेले होते. पाकिस्ताने विजय साजरा करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली ‘दिल्ली कसोटी’
दुसरी कसोटी सुरु होण्यापूर्वी काहीशी तणावाची परिस्थिती होती. मात्र, ४ फेब्रुवारी रोजी सामना ठरल्या वेळेत सुरू झाला. भारतीय कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिनने नाणेफेक जिंकत, फलंदाजीचा निर्णय घेतला. सकाळच्या आल्हाददायी वातावरणात, सदगोपन रमेश व वीवीएस लक्ष्मण यांनी भारताला आश्वासक सुरुवात दिली. पहिल्या गड्यासाठी ८८ धावा जोडल्यानंतर लक्ष्मण बाद झाला. राहुल द्रविडने रमेशला साथ देत भारताचा डाव आत्मविश्वासाने चालू ठेवला. रमेशने दमदार अर्धशतक झळकावले. वैयक्तिक ६० धावांवर रमेश बाद झाल्यानंतर, भारताचा डाव गडगडला. द्रविड, सचिन, गांगुली व नयन मोंगिया हे सर्व थोड्याफार धावसंख्येची भर घालून बाद झाले. कर्णधार अझरुद्दीनने एका बाजूने खिंड लढवत, ६७ धावांची खेळी केली. भारताचा पहिला डाव २५२ धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानकडून फिरकीपटू सकलेन मुश्ताकने सर्वाधिक पाच गडी बाद केले.
पाकिस्तानकडून भारताच्या २५२ धावांचा पाठलाग सुरू झाला आणि भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावर कुरघोडी करायला सुरुवात केली. अनिल कुंबळेच्या चार, हरभजनच्या तीन व श्रीनाथच्या दोन बळींंमुळे पाकिस्तानचा डाव १७२ धावात संपुष्टात आला. पाकिस्तानकडून शाहिद आफ्रिदीने सर्वाधिक ३२ धावा काढल्या. भारताला ८० धावांची आघाडी मिळाली होती.
पहिल्या डावातील ८० धावांच्या आघाडीमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला. आपला दुसरा सामना खेळत असलेल्या प्रतिभावंत सदगोपन रमेशने दमदार ९६ धावा फटकावल्या. वसीम अक्रम, वकार युनिस या वेगवान गोलंदाजांचा आत्मविश्वासाने सामना केला. सौरव गांगुलीने नाबाद ६२ धावा कुटल्या. गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या, श्रीनाथने आक्रमक ४९ धावांची खेळी केली. भारतीय संघ ३३९ धावांवर सर्वबाद झाला. आधीची ८० धावांची आघाडी मिळून, पाकिस्तानला विजयासाठी ४२० धावांचे लक्ष्य देण्यात आले.
४२० धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची दमदार सुरुवात
सामन्याच्या चौथ्या दिवशीच भारत विजय साजरा करेल, याचा अंदाज सर्वांना आला होता. सामन्यात भारताचे पारडे जड होते. हिवाळ्यातील थंडीत ७ फेब्रुवारी रोजी सामन्याचा चौथा दिवस उजाडला. पाकिस्तानचे सलामीवीर शाहीद आफ्रिदी व सईद अन्वर यांनी नेटाने फलंदाजी करायला सुरुवात केली. जवागल श्रीनाथ व व्यंकटेश प्रसाद यांचा पहिला स्पेल त्यांनी यशस्वीरित्या खेळून काढला. दोन्ही फलंदाजांनी पाकिस्तानची धावसंख्या १०१ पर्यंत नेली.
कुंबळेच्या कारनाम्याला सुरुवात
अनिल कुंबळेने टाकलेल्या, डावातील पंचविसाव्या षटकातील, दुसऱ्या चेंडूवर, शाहिद आफ्रिदी चकला आणि त्याच्या बॅटची कड घेऊन चेंडू यष्टीरक्षक नयन मोंगियाच्या हाती विसावला. भारतीय खेळाडूंनी अपील केले व पंच जयप्रकाश यांनी बोटवर केले. आफ्रिदी बाद झाला. या निर्णयावर नंतर, काहीसा वाद देखील निर्माण झाला. पण, त्यावेळच्या नियमांप्रमाणे एकदा बाद दिलेला फलंदाज बादच ठरवला जात. पुढच्या चेंडूवर, एजाज अहमद पायचीत झाला आणि भारतीय खेळाडूंसह प्रेक्षकांनी आनंद साजरा करायला सुरुवात केली. चार षटकांनंतर, कुंबळेने इंजमाम आणि मोहम्मद युसुफला एकाच षटकात बाद करत, पाकिस्तानची अवस्था ११५-४ अशी करून टाकली.
विश्वविक्रमाची लागली चाहूल
सईद अन्वर एकता पाकिस्तानसाठी संघर्ष करत होता व इतर फलंदाज फक्त हजेरी लावण्याचे काम करत होते. कुंबळेने ३७ व्या षटकात मोईन खान आणि ३९ व्या षटकात जम बसलेला सलामीवीर सईद अन्वरला ६९ धावांवर बाद केले. सातवा बळी सलीम मलिक यांच्या रूपाने पडला. जेव्हा, आठव्या गड्याच्या रूपात मुश्ताक अहमद तंबूत परतला, तेव्हा सर्वांना वाटले आज काहीतरी, इतिहास घडणार आहे. स्टेडियममधील तसेच टेलिव्हिजनवर सामना पाहणारे, सर्व प्रेक्षक कुंबळेने दहा बळी मिळवावेत, अशी प्रार्थना करू लागले. पुढच्या चेंडूवर नवा फलंदाज सकलेन मुश्ताक पायचित झाला. आता, कुंबळे एका असामान्य कामगिरीपासून फक्त एक बळी दूर होता.
भारताचे इतर गोलंदाज, जाणीवपूर्वक उजव्या यष्टीबाहेर गोलंदाजी करत होते. किंबहुना, भारतीय कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिनने सर्वांना तशी सूचना दिली होती. श्रीनाथने टाकलेल्या ५९ व्या षटकातील एका चेंडूवर वकार युनीसने चेंडू टोलावला व लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी धावला. मात्र, मैदानावरील सर्व प्रेक्षकांनी त्याला झेल सोडण्यासाठी आवाज दिला. सुदैवाने, तो झेल त्या क्षेत्ररक्षकाच्यासमोर पडला आणि सर्व क्रिकेटप्रेमींनी सुटकेचा निश्वास टाकला.
वसिम अक्रमने घडविले खिलाडूवृत्तीचे दर्शन
पाकिस्तानचा कर्णधार वसिम अक्रमने या वेळची एक आठवण सांगताना म्हटले, “वकार आणि मी फलंदाजी करत होतो. वकार मला म्हटला, भाई, रनआऊट होऊया का ? तेव्हा, मी त्याला म्हटले, अनिलच्या नशिबात असेल, तर तो आपल्याला बाद करेल. आपण मुद्दाम बाद व्हायचे नाही. तू म्हणतोय ते, खिलाडूवृत्तीला धरून होणार नाही.”
‘तो’ ऐतिहासिक क्षण
अखेरीस, तो ऐतिहासिक क्षण आला. ६० व्या षटकातील तिसऱ्या चेंडूने अक्रमच्या बॅटची कड घेतली, चेंडू पॅडवर आदळला आणि शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या लक्ष्मणच्या हाती विसावला. फिरोजशहा कोटला मैदानावर इतिहास रचला गेला होता. जिम लेकर यांच्या विश्वविक्रमाची बरोबरी झाली होती. सर्व खेळाडू आणि प्रेक्षक आनंदाने बेभान होऊन नाचत होते. खेळाडूंनी अनिल कुंबळेला खांद्यावर उचलून घेतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील या अजबगजब विक्रमाची नोंद एका भारतीयाच्या नावे झाले होती. या विजयासोबतच ही मालिका बरोबरीत सुटली. त्या रात्री हॉटेलवर भारतीय खेळाडूंनी जोरदार जल्लोष साजरा केला.
#OnThisDay in 1999, #TeamIndia spin legend @anilkumble1074 became the first Indian bowler and second overall to scalp all the 10 wickets in a Test innings. 👏👏
Watch that fantastic bowling display 🎥👇 pic.twitter.com/OvanaqP4nU
— BCCI (@BCCI) February 7, 2021
विश्वविक्रमापलीकडच्या रोचक गोष्टी
या विश्वविक्रमावेळी, सचिन तेंडुलकरने एक अंधश्रद्धा पाळली होती. तो, कुंबळे षटक टाकण्यासाठी, येण्यापूर्वी कुंबळेचा स्वेटर व गॉगल पंच जयप्रकाश यांच्याकडे देत. जेणेकरून कुंबळे थकू नये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कुंबळेला सर्वच्या सर्व बळी, एकाच बाजूने मिळाले आणि सर्व निर्णय ए.व्ही जयप्रकाश या पंचांनी दिले होते.
या विक्रमावर अनेकांनी बोट ठेवले, अनेक वाद झाले. मात्र, कुंबळेसारखा विक्रम त्यानंतर आजपर्यंत २१ वर्षात कोणाला मोडता आला नाही. अनिल कुंबळेने आपल्या टोपणनावाप्रमाणेच, केलेली ही ‘जंबो’ कामगिरी आजही क्रिकेटचाहत्यांच्या डोळ्यासमोरून जात नाही.
वाचा –
प्रेमासाठी काहीपण! भारताचा ‘जंबो’ गोलंदाज कुंबळेने प्रेमासाठी दिली होती न्यायालयीन लढाई
नयन मोंगिया आणि मनोज प्रभाकरची ‘ती’ कुविख्यात भागीदारी