---Advertisement---

अन् वॉटलींगच्या दैदिप्यमान कारकिर्दीवर WTC चा सुवर्णकलश चढला

On: बुधवार, जून 23, 2021 11:38 PM
---Advertisement---

बुधवारी (२३ जून) कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच आयोजित केलेली जागतिक कसोटी चॅम्पियनशिप समाप्त झाली. न्यूझीलंडने फेवरेट्स मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला पराभूत करत क्रिकेटमधील सर्वात मोठा खिताब आपल्या नावे केला. न्यूझीलंड संघाने या विजेतेपदासोबतच गेली १२ वर्ष न्यूझीलंड क्रिकटचा भार वाहणाऱ्या यष्टीरक्षक ब्रॅडली जॉन उर्फ बीजे वॉटलींग याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विजयी समारोप केला. न्यूझीलंड क्रिकेट इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देऊन देखील सर्वात कमी चर्चा झालेला हा खेळाडू कोण हे जरा जाणून घेऊया.

डर्बन टू न्यूझीलंड
ब्रॅडली जॉन वॉटलींग असे पूर्ण नाव असलेला हा खेळाडू क्रिकेटविश्वात बीजे वॉटलींग म्हणूनच ओळखला गेला. त्याचा जन्म खरेतर दक्षिण आफ्रिकेतील डर्बनचा मात्र तो अवघ्या १० वर्षाचा असताना त्याचे कुटुंबीय न्यूझीलंडला स्थायिक झाले. पुढील शिक्षण आणि सर्व क्रिकेट कारकीर्द न्यूझीलंडमध्येच घडली.

आधी न्यूझीलंडचे एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात प्रतिनिधित्व आणि त्यानंतर अत्यंत मेहनतीने त्याने वरिष्ठ संघात २००९ मध्ये जागा मिळवली.

न्यूझीलंडचा सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज?
आता वॉटलींग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या आकडेवारीची सूक्ष्म चर्चा करायला नको. त्याने न्यूझीलंडसाठी ७५ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये ४००० च्या आसपास धावा बनवल्या, एका द्विशतकासह ८ शतके झळकावली व यष्टीरक्षक म्हणून २७० गडी बाद केले. त्याची मर्यादित षटकांची कारकीर्द अगदी छोटी राहिली. ऍडम गिलख्रिस्ट, लेस एमेस व ऍण्डी फ्लॉवर यांच्यासारख्या दिग्गज यष्टीरक्षकांसोबत त्याची तुलना जरी होऊ शकत नसली तरी त्याचे आकडे या सर्वांशी जरासे साधर्म्य दाखवणारे आहेत.

वॉटलींगच्या पदार्पणानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याच्यापेक्षा अधिक धावा कोणीही काढल्या नाहीत. तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असूनही, न्यूझीलंडसाठी या कालावधीत सर्वाधिक धावा बनविणारा चौथा फलंदाज आहे. फक्त यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केवळ ब्रेंडन मॅक्युलम त्याच्या जवळपास येऊ शकतो.

फलंदाजी आणि यष्टीरक्षणाची विशिष्ट शैली
वॉटलींगला खऱ्या अर्थाने ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ म्हणता येईल. त्याची धावा बनवण्याची एक वेगळीच शैली होती. अजीबात घाई न करता गोलंदाजांना थकवून-थकवून तो खराब चेंडूंवर धावा वसूल करत. सहाव्या गड्यासाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विश्वविक्रम त्याने सर्वप्रथम ब्रेंडन मॅक्युलमसोबत (३५२) बनवला आणि नंतर केन विलियम्सनसोबत (३५६) मोडला.

यष्टीरक्षणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, त्याचे वेगळेपण निश्चित दिसून येते. कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात देखील पूर्ण समर्पणाने तो यष्टीरक्षण करताना दिसून आला. त्याच्यासोबत तुलना करायची झाल्यास, सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या टिम पेन, रिषभ पंत व निरोशन डिकवेला यांच्यापेक्षा तो सर्वात कमी चुका करताना दिसून येत. इतर यष्टीरक्षकांप्रमाणे तो कधीची स्टंम्प्समागून काही बोलताना दिसला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खऱ्या अर्थाने अखेरचा पारंपारिक शैलीचा यष्टीरक्षक म्हणून देखील वॉटलींगची नोंद करता येईल.

निवृत्तीचा निर्णय
न्यूझीलंडने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्रता मिळवल्यानंतर वॉटलींगने आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केली होती. आपल्या कारकीर्दीत त्याने न्यूझीलंड क्रिकेट संघासोबत काही सुवर्णक्षण पाहिले. मॅक्युलम व विलियम्सन या न्यूझीलंड क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजासोबत केलेल्या दोन विश्वविक्रमी भागीदाऱ्या असो, साऊदी, बोल्ट व वॅग्नर या क्रिकेटविश्‍वातील उत्कृष्ट तिकडीचे वेगवान चेंडू आपल्या ग्लोव्हजद्वारे त्याने अक्षरश थोपवले.

कारकिर्दीच्या संध्याकाळी कायले जेमिसनसारख्या प्रतिभावंत खेळाडूला यष्ट्यांमागून त्याचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर आता अखेरीस जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या रूपाने त्याच्या कारकिर्दीवर सुवर्णकलश चढला.

वॉटलींगचे न्यूझीलंड क्रिकेट इतिहासातील स्थान काय याबाबत अनेक वादविवाद होऊ शकतात. मात्र, ज्यावेळी संघाचे पहिले ४-५ प्रमुख फलंदाज तंबूत परतल्यानंतर, बॅट घेऊन मैदानात उतरत जगातील सर्वोत्तम गोलंदाजांना सामोरा जाणारा सर्वात धाडसी यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून त्याची आठवण नक्कीच काढली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ कारणामुळे विराट WTC मध्ये फ्लॉप; माजी दिग्गजांनी दाखवून दिली कोहलीची चूक

चार दिवस दुखापतीसह खेळत वॅग्नरने न्यूझीलंड चाहत्यांना क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा दिवस दाखवला

WTC Final 2021: न्यूझीलंड म्हणजे कसोटी’किंग’, भारताला पराभूत करत पटकावले पहिलेवहिले विश्वविजेतेपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---