-आदित्य गुंड
घात झाला, घात झाला… अशीच काहीशी भावना काल रात्री बार्सिलोना फॅन्सची होती. या क्लबचा आणि मेस्सीचा मोठा फॅन असलेल्या एका मित्राला मी ‘मेस्सी क्लब सोडणार’ अशा आशयाचं ट्विट शेअर केलं. त्याने प्रत्त्युत्तर म्हणून ‘मेस्सी क्लबमध्येच राहणार’ अशा आशयाचं ट्विट करत सोबत एक हसणारा इमोटीकॉनसुद्धा टाकला.
नाही म्हटलं तरी फुटबॉल जगत आणि खासकरून बार्सिलोना फॅन्सना अशा बातम्यांची सवयच आहे. गेली अनेक वर्षे मेस्सीचे काँट्रॅक्ट रिन्यू करायची वेळ आली की तो क्लब सोडणार का?कोणत्या क्लबकडे जाणार? अशा चर्चा झडू लागतात. अखेरीस मेस्सी बार्सिलोनामध्येच राहणार अशी बातमी येऊन या चर्चांना विराम दिला जातो.
यावेळीसुद्धा असंच काहीसं झालं. नेहमीप्रमाणे हीसुद्धा बातमी खोटी ठरणार असं बार्सिलोना फॅन्स धरून चालले होते. तेच काय, इतरही लोक असंच धरून चालले होते. मात्र एका क्षणी आजघडीला फुटबॉल जगतातील सर्वात विश्वासू सूत्र ज्याला मानलं जातं त्या फॅब्रिझिओ रोमानो याने मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यात नवीन काँट्रॅक्ट होऊ शकत नसल्याचं ट्विट केलं आणि इंटरनेट अक्षरशः हादरून गेलं. व्हाट्सअप्प ग्रुप, फेसबुक, ट्विटर सगळीकडे फक्त आणि फक्त हीच चर्चा होती आणि अजूनही आहे.
इतर फुटबॉल क्लबच्या फॅन्सलासुद्धा या बातमीवर विश्वास बसला नाही एवढं पक्क मेस्सी आणि बार्सिलोना यांचं नातं होतं. मात्र गेल्या वर्षांपासून क्लब व्यवस्थापन, विशेषतः क्लबचे माजी अध्यक्ष जोसेफ मारिया बार्टोमेऊ यांच्यात आणि मेस्सीमध्ये काहीसा बेबनाव होता. हा वाद इतका विकोपाला गेला होता की क्लबच्या फॅन्सने अध्यक्षांची हकालपट्टी करा म्हणून रस्त्यावर उतरत मोर्चे काढले होते. त्याची परिणती अर्थातच बार्टोमेऊ यांची गच्छंती होण्यात आणि मेस्सी आणखी एक वर्ष क्लबकडे राहण्यात झाली.
मात्र मेस्सी क्लब सोडणार या वावड्या अधूनमधून उठत राहिल्या. याला दोन कारणे होती.
एक म्हणजे इंग्लिश प्रीमियर लिगमधील संघ मँचेस्टर सिटीला चॅम्पियन्स लीग जिंकण्यात आलेले अपयश. दुसरं म्हणजे फ्रान्समधील पीएसजी या क्लबला चॅम्पियन्स लीग जिंकण्यात आलेले अपयश. या दोनही संघाची मालक अरब शेखांकडे आहे. चॅम्पियन्स लीग जिंकण्याकरता वाटेल तेवढा पैसा खर्च करण्याची ऐपत असलेले हे दोनच क्लब आहेत.
फुटबॉल जगतात सर्वात यशस्वी कोचेसपैकी एक मानल्या जाणारे पेप गार्डीओला हे सिटीचे प्रशिक्षक आहेत. सिटीकडे येण्याआधी त्यांनी ४ वर्षे बार्सिलोनाचे कोच म्हणून काम केले होते.या कालावधीत क्लबने आणि मेस्सीने धुमाकूळ घातला होता. क्लब फुटबॉल विश्वात जे काही जिंकण्यासारखं आहे ते सगळं या काळात बार्सिलोनाने जिंकलं. मेस्सी तर पेपच्या गळ्यातला ताईत झाला. किती?तर सिटीचा प्रशिक्षक असताना भर पत्रकार परिषदेतसुद्धा पेप मेस्सीचे गोडवे गायचा, अजूनही गातो एवढा! त्यामुळे मेस्सीने बार्सिलोना क्लब सोडला तर तो सिटीकडे जाऊन पेपबरोबर रियुनियन करेल अशी अटकळ सगळ्यांनी बांधली होती. गेल्यावर्षी तसं झालं नाही तरी आता हे घडू शकेल.
मेस्सी जाऊ शकेल असा दुसरा क्लब म्हणजे पीएसजी. इथेही पैशाची कमी नाही. एखादा क्लब एखाद्या खेळाडूला आपल्याकडे आणण्यासाठी खटपट करत असताना गुपचूप येऊन ज्यादा पैसे देऊन त्याला खरेदी करण्यात पीएसजी माहीर आहे. पैशाच्या जोरावर क्लब हे करू शकतो. मेस्सीचा बार्सिलोनामधील साथीदार नेमार सध्या या क्लबकडून खेळतो. फुटबॉल सोडून दोघांची बाहेर चांगली मैत्री आहे. त्यामुळे तो मेस्सीला पीएसजीकडे येण्यासाठी राजी करू शकतो. दोघांचा एकत्र फोटोही अलीकडे व्हायरल झाला होता.
मेस्सी कोणत्या क्लबकडे जाणार हे सध्या बाहेर आले नसले तरी तो बार्सिलोना सोडणार हे बऱ्यापैकी निश्चित मानले जात आहे. तरीही फॅन्सला ‘तो जाणार नाही’ वेडी आशा आहेच. मेस्सीने या फॅन्सला किती आणि काय काय दिलंय हे त्यांनाच चांगलं माहीत आहे. त्यामुळे आपला आवडता खेळाडू क्लब सोडतोय यावर पटकन विश्वास ठेवणं त्यांना अवघड जाईल. कित्येकजण मेस्सी गेला तर तो जिथे जाईल त्या क्लबला सपोर्ट करतील. कारण त्यांची निष्ठा त्यांनी मेस्सीला वाहिली आहे. रोनाल्डो जेव्हा क्लब बदलतो तेव्हा त्याचे फॅन्ससुद्धा क्लब बदलतात. त्यांना प्लॅस्टिक फॅन्स म्हणून हिणवणारे बार्सिलोना फॅन्स आता काय करतात बघूयात.