आयपीएलचा ब्रॉर्डकास्टर्सनी आणि तमाम चाहत्यांनी आठवडाभरापासून ज्या दिवसाचा माहोल बनवला होता तो दिवस आला. तारीख 30 एप्रिल. कमीत कमी भारतीय क्रिकेटप्रेमींना तरी आता या दिवसाचे वेगळे दिनविशेष सांगावे लागत नाही. ज्याप्रकारे 23 एप्रिल, 7 जुलै आणि 5 नोव्हेंबर हे दिवस आता सचिन, धोनी व विराटच्या जन्मतारखेमुळे ओळखले जातात तसाच आजचा 30 एप्रिल हा दिवस, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि करोडो चाहत्यांच्या हिटमॅनचा बर्थडे म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. आज तोच दिवस. शर्माजी 37 चे झालेत! सध्या सर्वोत्तमाच्या परिमाणात बसणारा रोहित बोरीवलीच्या गल्लीपासून इथपर्यंत कसा पोहोचला? त्याचा घेतलेला हा धावता मागोवा…
मुंबईकर म्हणून जगभरात ओळखला जाणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) जन्माने नागपूरकर आहे हे अनेकांना माहीत नाही. असे असले तरी त्याचे नागपूरशी नाते केवळ तितकेच. रोहितला समजतही नव्हते त्या वयात त्याचे कुटुंब मुंबईत आले. रोहितच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती. दोन मुलांचा सांभाळ करणेही त्याच्या वडिलांसाठी जिकीरीचे होते. त्यामुळे रोहितचा मुक्काम कधी आजी-आजोबा, काकांकडे कधी आई-वडिलांकडे असायचा.
भारतीय क्रिकेटची पंढरी मुंबईत लहानपण घालवत असताना, रोहितलाही हा नाद भरू नये, असं कसं होऊ शकतं? नैसर्गिक गुणवत्ता घेऊनच रोहित जन्माला आलेला. छोट्या-मोठ्या स्पर्धा गाजवत होता. अशात त्याच्यावर नजर पडली दिनेश लाड नावाच्या जोहरीची! हे पोरग नाव करणार हे त्यांना पहिल्याच नजरेत समजलं. त्यांनी त्याला थेट ते शिक्षक असलेल्या स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र, आपल्या घरच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज असलेल्या रोहितने नकार दिला. लाड सरांना कुठून तरी ही परिस्थिती समजली. कोणत्याही कारणाने याचं क्रिकेट बंद नाही झालं पाहिजे असा चंग त्यांनी बांधला होता. बरीच खटपट केल्यानंतर ते रोहितला 4 वर्षांसाठी क्रीडा शिष्यवृत्ती मिळवून देण्यात यशस्वी ठरले. आणि तिथून सुरू झाला रोहितचा हिटमॅन होण्यापर्यंतचा प्रवास.
ज्या मुंबई क्रिकेटमध्ये दरवर्षी शेकडो मुले सचिन होण्याच्या दृष्टीने तयार होत असतात, त्यामध्ये रोहित हा ‘रोहित शर्मा’ होण्याकडे वाटचाल करत होता. वयोगट क्रिकेटमध्ये तर त्याचा कोणी नादही करत नव्हते. शिस्त आणि तितक्याच आपुलकीने लाड सर त्याच्यातून मेहनत करून घेत होते. वयाच्या 17-18 या वर्षी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा बोलबाला सुरू झाला. मागे एका मुलाखतीत विराट कोहली सांगत होता, “2007 च्या सुरुवातीला मोठी चर्चा व्हायची रोहित शर्मा नावाचा कोणीतरी प्लेयर येणार आहे. लहान पोरग भल्याभल्यांना मारत. आम्ही म्हणायचो त्याच्याच वयाचे आम्हीही आहोत. असं नक्की याच्यात काय आहे? मात्र, जेव्हा त्याला टी20 वर्ल्डकपमध्ये त्याला बॅटिंग करताना पाहिलं आणि म्हणलं, ये चीज ही अलग है.”
त्याच टी20 वर्ल्डकपपासून रोहित शर्मा मेनस्ट्रीम क्रिकेटमध्ये आला. पुढे आयपीएल आली, ती गाजवली. टीम इंडियात सातत्याने संधी मिळाली. एखाद दुसरी इनिंग सोडल्यास रोहित फ्लॉप ठरला. यातून व्हायचं तेच झालं आणि 2011 वनडे वर्ल्ड कपच तिकीट हुकलं. जूनियर विराटला संधी मिळाली होती. पण, आपल्याकडे म्हण आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. वर्ल्डकप टीममध्ये जागा न मिळणे, ही घटना त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली.
दिनेश लाड सांगतात त्याप्रमाणे, रोहितमध्ये टॅलेंट होत, पण सिरीयसनेस नव्हता. टिपीकल ‘मुंबई बॉय’ सारखं ‘जो होगा देखा जायेगा’ हा ऍटीट्युड त्या घटनेनंतर संपला. तो दिवस-दिवस सराव करू लागला. फिटनेस आला आणि टीम इंडियात कमबॅकही झालं. तो काळ असा होता ज्यावेळी टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू बाहेर होत होते. रोहितला संधी मिळत होती पण श्रीलंका दौऱ्यावर तो सुपरफ्लॉप ठरलेला. अशात धोनीने त्याला 2013 चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ओपनर म्हणून उतरवायचा निर्णय घेतला.
गांगुलीने ज्याप्रकारे सेहवागला फिनिशरचा ओपनर केलेला, अगदी तसाच हा निर्णय. त्यावेळी सेहवागने गांगुलीच्या निर्णयाला न्याय दिलेला आणि यावेळी रोहितने धोनीच्या निर्णयाला. ज्या सेहवागला पाहण्यासाठी लहानपणी शाळा बुडवलेल्या रोहितने त्याच जागेवर त्याचा वारसा पुढे नेण्यास सुरुवात केली होती..
त्याच वर्षी रोहितच्या खांद्यावर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी येऊन पडलेली. तिथे देखील वारसा चालवायचा होता ‘द रिकी पॉंटिंग’चा! अर्ध्या हंगामातून नेतृत्व स्वीकारलेल्या रोहितने संघाला चॅम्पियन बनवलं होत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून विक्रमांचे इमले रचले जात होते. 2015 मध्ये दुसरी आयपीएल ट्रॉफी तर 2017 मध्ये तिसरी. आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार बनलेला रोहित. आणि इथेच नवे नामकरणही झालेले ‘हिटमॅन’!!!
पुढे 2019-2020 ला आणखी दोनदा मुंबई चॅम्पियन बनली. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलेल. भारतीय क्रिकेटच्या ‘इनक्रेडिबल थ्री’ मध्ये धोनी आणि विराटनंतर तिसरं नाव होतं रोहित शर्मा. 2021 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन इथपर्यंत बोरीवलीतून सुरू झालेला हा प्रवास पोहोचला होता. पाठीमागे होते कमावलेल्या विक्रमांचे आणि धावांचे भक्कम पाठबळ! आणि त्याहून महत्त्वाची म्हणजे त्याने घेतलेली अपार मेहनत! (Special story about rohit sharma read here)