आताची ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम बघून तुम्ही म्हणताल यांची टीम भारीये लेका. ऍरॉन फिंचच्या टीमने टी२० वर्ल्डकप जिंकल्यावर अनेकांनी म्हटले आता ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा वर्ल्ड क्रिकेटवर राज्य करायला सुरुवात करेल. पहिल्या हेडन- गिलख्रिस्टसारखे आताचे फिंच- वॉर्नर थोडेफार वाटतात. सायमंड्ससारखाच मॅक्सवेल, पॉटिंगसारखा स्मिथ आणि बेवन-मार्टिनची आठवण करून देणारे मार्श- स्टॉयनिस. या सगळ्या जागा भरून निघत असल्या, तरी एक जागा मात्र रिकामी राहिलीय आणि कदाचित ती तशीच राहील. ती जागा असेल मिस्टर क्रिकेट माईक हसीची.
जवळपास सहा फूटाची उंची. चेहऱ्यावर सतत स्माईल. ओठांवर लावलेली झिंक पावडर आणि गालावर- नाकावर सनस्क्रीन. अशी ओळखच माईक हसीची होती. अनेकांना तर प्रश्नच पडायचा, ‘च्यायला त्याच्या तोंडावर हे कसले चट्टे पडलेत?’ स्टीव वॉ रिटायर झाल्यावर रिकी पॉंटिंगने वर्ल्ड क्रिकेटमध्ये दहशत घालणारी टीम बनवली त्यात टीममध्ये सगळ्यात लेट एन्ट्री केली हसीने. लेट पण थेट म्हणतात ना तसा दरारा मात्र त्याने निर्माण केलाच.
माईक हसीच्या इंटरनॅशनल करिअरकडे जायच्या आधी त्याने किती कष्ट केलं, हे तर माहीत असायलाच हवे. हसी इतका मोठा क्रिकेटर झाला म्हणजे त्याला लहानपणापासूनच हा नाद असेल असं तुम्हाला वाटेल, पण इथ ट्विस्ट आहे ना. ज्या माईक हसीची बॅटिंग बघून लोकांच्या तोंडातून कौतुकाचे शब्द यायचे, त्या हसीला क्रिकेटर व्हायचंच नव्हतं. सगळे क्रिकेट बघतात म्हणून तो पण क्रिकेट बघायचा. भाऊंनी अगदी लहानपणीच डोक्यात फिट बसवलेलं की आपल्याला सायन्सचा प्रोफेसर व्हायचंय.
हेही पाहा- एका जिव्हारी लागलेल्या पराभवामुळे माईक हसी क्रिकेटर झाला
सन १९८२च्या ऍशेसची बॉक्सिंग डे टेस्ट चांगलीच रंगलेली. आठ वर्षाचा माईक टीव्हीवर मॅच बघत होता. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला ऍलन बॉर्डर जिंकून देतील असं वाटत असताना इंग्लंडने तीन रनांनी मॅच मारली. ऐतिहासिक मॅच जिंकता जिंकता राहिली. याचा परिणाम तिकडे टीव्हीवर मॅच बघत असलेल्या छोट्या हसीवर झाला. गड्याने बॅट उचलली अन् सरळ घराच्या मागे जाऊन डाव्या हातानं बॅटिंग करायला सुरुवात केली. हसी मुळात उजव्या हाताचा. बाकी सगळे काम उजव्या हाताने आणि बॅटिंग फक्त डाव्या हाताने. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये जणू काय नियम आहे. तुम्हाला ग्रेट ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बनायचं असेल, तर तुमच्या नैसर्गिक हाताने बॅटिंग न करता तुम्हाला उलट्या हाताने बॅटिंग करायला लागेल. मार्क टेलर, नील हार्वी, मॅथ्यू हेडन, ऍडम गिलख्रिस्ट, मायकल क्लार्क ही अशीच काही मंडळी.
डाव्या हाताने खेळायचा प्रवास सुरू झाला आणि हसी घडू लागला. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच भल ज्या स्कीमने केल त्या स्कीममध्ये हसी, ब्रेट ली आणि जेसन गिलेस्पीसोबत स्कॉलरशिप मिळवायला पात्र झाला. ऑस्ट्रेलिया म्हणजे फास्ट बॉलरची खाणच. त्यातून बिंगा ब्रेट आणि गिलेस्पी पटकन सीनियर संघात आले. हसी होता मिडल ऑर्डर बॅट्समन, आणि तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग लाईनअपमध्ये नाव होती वॉ ब्रदर्स, पॉंटिंग, मार्टिन. आता एवढ्या साऱ्या गर्दीत हसीला चान्स मिळायला वेळ लागला. जिथं त्याच्यासोबत ज्युनिअर क्रिकेट खेळलेल्या गिलेस्पीच करियर संपायला सुरू झालं तिथं हसी पहिला चान्स मिळवत होता. ते पण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये १५ हजार रन करून तिसाव्या वर्षी.
हसीला ऑस्ट्रेलियाचा लक्ष्मण म्हणलं तरी चालेल. जसं लक्ष्मणने आपल्या करिअरमध्ये नेहमी टेल इंडर्सला सोबत घेत अशक्यप्राय मॅचेस काढून दिल्यात तसच. हसीनं ऑस्ट्रेलियासाठी केलं. ते पण तिन्ही फॉरमॅटमध्ये.
तसं तर हसीने आपल्या साऱ्या करिअरमध्ये अनेक लक्षात राहणार्या इनिंग खेळल्या, पण एक इनिंग त्याला जणू काही अजरामर करून गेली. २०१० टी२० वर्ल्डकप सेमी फायनलला ऑस्ट्रेलिया पाकिस्तान भिडत होते. पाकिस्तानला सलग तिसऱ्या टी२० वर्ल्डकप फायनलमध्ये एंट्री मारायची होती. ऑस्ट्रेलियाला जिंकायला लास्ट पाच बॉलमध्ये १७ रनांची गरज होती. सईद अजमल फुल कॉन्फिडन्समध्ये होता. त्याला वाटलं एक बॉल काढला की मॅच आपलीच, पण त्याला काय माहित पुढे मिस्टर क्रिकेट उभा राहिलाय. हसीन सिक्स, सिक्स, फोर, सिक्स असा धुमाकूळ घालत चार बॉलात मॅच संपवली. आज पण टी२० च्या हिस्टरीतील ही बेस्ट इनिंग आहे.
हसीला आपण सारख-सारख मिस्टर क्रिकेट म्हणतोय पण हे नाव त्याला पडलंय त्याच्या बुद्धीसाठी. क्रिकेटचा असा कोणता नियम नसेल जो हसीला माहित नाही. इतकच काय तर तो इतका हुशार होता की कॅप्टन त्याच्याकडून टिप्स घ्यायचा. टीममेट्स हस म्हणायचे पण इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटॉफने त्याचं बारसं घातल मिस्टर क्रिकेट नावाच.
हसी ब्रदर्स कुणाला माहित नाही असे फारच कमी क्रिकेटप्रेमी. दोनही भावांचं एकमेकांवर अतीव प्रेम. म्हणून एकदा हे दोन्ही भाऊ एका सामन्यात आमने-सामने आल्यावर एक मोठा किस्सा घडला. माईक पहिल्या डावात कमी धावांवर बाद झाला. तेव्हा तो खूपच निराश झाला. त्याला वाटले की आपले करियर संपल्यात जमा आहे. परंतू विरोधी संघातील त्याचा भाऊ डेविडने त्याला पाठिंबा दिला व म्हटला की आमच्या संघाची जोरदार धुलाई कर. दुसऱ्या डावात घडलही तसंही. माईकने चक्क ११८ धावांची खणखणीत खेळी केली होती. यावेळी दुसऱ्या बाजूला संघनिष्टेमुळे हताश झालेला डेविड मात्र माईकचं कौतूक करत होता.
हसीच करियर उशिरा सुरू झालं तसं त्याने ते आणखी लांबवल. आयपीएलमध्ये तर त्याच वजन होतं. आयपीएल ओपनरला मॅकलमने राडा घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी हसीने पण शतकी तुफान आणलेल. चेन्नईला दोनदा चॅम्पियन बनवण्यात तोच पुढे होता. इतकंच काय ३८व्या वर्षी ऑरेंज कॅप जिंकली पठ्ठ्यानं.
हसीच जितकं प्रेम क्रिकेटवर तितकंच फुटबॉलवरही. मॅन्चेस्टर युनायटेडचा तर तो जबरा फॅन. रिटायर झाल्यावर तो कोच बनला. साऊथ आफ्रिकेच्या टीमला कोचिंग दिलं आणि आता चेन्नईच्या सुपर किंग्सला बॅटिंग शिकवतोय. इंडियन नसून पण इंडियन्सनी ज्यांच्यावर भरपूर प्रेम केलं त्यापैकी एक हसी. आपल्या एक से बढकर कडक शॉटनी बॉलर्सला घाम फोडणारा हसी सगळ्यांचाच फेवरेट राहील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलला मोठी करणारे पाच श्रीलंकन लिजेंड, यांच्याबद्दल जाणून घेतलंच पाहिजे
धोनीने धावांचा पाऊस पाडणाऱ्या हेडनला ‘ती’ बॅट वापरण्यास केलेला विरोध, काय होती त्या बॅटची खासियत?
चीयरलीडरच्या ‘त्या’ आरोपामुळे आयपीएलची अब्रू चव्हाट्यावर आली