क्रिकेटला कायम ‘जेंटलमन्स गेम’ म्हटले जाते. कधी कधी या खेळाला खेळाडूंच्या कृत्याने गालबोट लागले. मात्र, क्रिकेटची प्रतिमा जास्त खराब होणार नाही याची काळजी सर्व खेळाडूंनी घेतली. भारताचा दिग्गज राहुल द्रविडला क्रिकेटमधील ‘द लास्ट जेंटलमन’ असे म्हटले जाते. सध्या न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा आपल्या वर्तणुकीतून क्रिकेटची गरिमा नेहमीच जपत असतो. परंतु, या दोघांव्यतिरिक्त अलीकडच्या काळात क्रिकेटचे सभ्य माणसांचा खेळ हे बिरुद सार्थ ठरवण्याचे काम आणखी एका क्रिकेटपटूने केले. आपल्या १५ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत नेहमी मैदानावर अत्यंत आत्मीयतेने क्रिकेटची सेवा करणारा हा क्रिकेटपटू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हाशिम आमला. आज अमला आपला ३९वा वाढदिवस साजरा करत आहे.
आमला गुजराती छे
आमलाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घ्यायचे झाले तर, त्याचा आणि भारताचा खुप नजीकचा संबंध आहे. आमलाचे आजोबा हे भारतातील गुजरात राज्यामधील सुरत शहराचे निवासी. मात्र, भारत स्वतंत्र होण्यापूर्वी त्यांनी व्यवसायाच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिका गाठली. दक्षिण आफ्रिकेत डर्बन येथे ते स्थायिक झाले. आमला आजही भारतात आल्यानंतर आपल्या नातलगांची गाठ घेण्यासाठी सुरतला जात असतो.
आमलाचा जन्म डर्बन येथे ३० मार्च १९८३ रोजी झाला. त्याचे कुटुंब बऱ्यापैकी सधन होते. आमलाने आपले शिक्षण त्याच शाळेतून पूर्ण केले, ज्या शाळेमध्ये दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटू बॅरी रिचर्ड्स व लान्स क्लुसनर शिकले होते. आमला व त्याचा मोठा भाऊ अहमद हे दोघे बरोबर क्रिकेटचे धडे गिरवत होते.
वेगाने केली प्रगती
शालेय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेमध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी केल्यानंतर लवकरच त्याला क्लाझुलू-नाताळ डॉल्फिन संघाने करारबद्ध केले. पुढे, तो दक्षिण आफ्रिकेच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार बनला. २००२ मध्ये न्यूझीलंड येथे झालेल्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात त्याने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत संघाला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून दिली. अवघ्या दोन वर्षातच तो दक्षिण आफ्रिकेच्या वरिष्ठ संघात खेळू लागला. विशेष म्हणजे त्याचा मोठा भाऊ अहमद यानेदेखील २००२ मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय वंशाचा खेळाडू होण्याचा मान मिळविला होता. मात्र, त्याची कारकीर्द तितकीशी मोठी होऊ शकली नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी
आमलाने जेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हापासून तो दक्षिण आफ्रिका संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू झाला. त्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेटची पंधरा वर्षे सेवा केली आणि दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मान मिळवला. जगभरातील असे कोणतेच मैदान राहिली नाही जे त्याने आपल्या बॅटने गाजवले नाही.
आमलाने संपूर्ण कारकिर्दीत विराट कोहलीला मागे सोडण्याचे काम केले. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २०००, ३०००, ४०००, ५००० व ६००० धावा ठोकण्याचा मान त्याच्याकडे जातो. सोबतच, सर्वात वेगवान २२ शतके देखील त्यानेच ठेवले आहेत. त्याच्या कामगिरीत इतके सातत्य होते की, मि.कंसिस्टंट असे बिरूद त्याच्यासाठी वापरले जायचे. २०१३ मध्ये तो वनडे आणि कसोटी क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानावर होता. अशी कामगिरी करणारा तो रिकी पॉटींगनंतरचा दुसराच खेळाडू होता.
आमलाने काही काळ दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व देखील केले. परंतु, फलंदाज म्हणून मिळालेले यश त्याला तिथे मिळवता आले नाही. कारकीर्दीच्या अखेरीस तो दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा बनवणारा दुसरा खेळाडू बनला. २०१९ क्रिकेट विश्वचषकानंतर त्याने अचानकपणे सर्वांना चकित करत ३६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.
डीन जोन्स म्हणाले होते आतंकवादी
आमला आपल्या संपूर्ण कारकिर्दीदरम्यान वादांपासून अलिप्त राहिला. मात्र, त्याच्या निष्कलंक कारकिर्दीशी एक वाद विनाकारण जोडला गेला. २००६ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान आमलाने कुमार संगकाराचा झेल घेतला असता, समालोचन करणाऱ्या डीन जोन्स यांनी ‘आतंकवाद्याने आणखी एक झेल टिपला’ असे म्हटले. यानंतर हा वाद चांगलाच पेटला. तमाम चाहत्यांनी जोन्स यांना धारेवर धरले. जोन्स ज्या प्रसारण वाहिनीसाठी समालोचक म्हणून काम करत, त्या वाहिनीने तर त्यांना तात्काळ करारमुक्त केले. पुढे जोन्स यांनी आमलाची जाहीर माफी मागितली.
आमला मुस्लिम धर्म खूप मानतो. तो नेहमी दाढी राखतो. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला प्रायोजकत्व देणाऱ्या एका मद्य कंपनीचा लोगो आपल्या जर्सीवर लावण्यास त्याने नकार दिला होता. यामुळे सुरुवातीचे काही वर्ष त्याला मॅच फीमधील रक्कमही मिळत नव्हती. अखेर Castle Lager कंपनीने अमलाला लोगो न लावण्याची परवानगी दिली. लोगो लावण्यास नकार देणारा अमला क्रिकेट विश्वातील पहिला खेळाडू होता. आजकाल अनेक मुस्लिम क्रिकेटर लोगो लावण्यास नकार देतात किंवा लावत नाहीत. याचे कारण ठरला तो हशिम आमला. काही वेबसाईट्सनुसार अमला लोगो न लावण्यामुळे जवळपास ५०० डॉलर प्रत्येक सामन्यादरम्यान गमावत असे.
लांबलचक दाढी, फलंदाजीची अनोखी पद्धत, फ्लिक आणि एक्स्ट्रा कव्हरवरुन मारलेले फटके चाहत्यांना मंत्रमुग्ध करतात. शास्त्रीय संगीतासारख्या भासणाऱ्या त्याच्या या फलंदाजीचे हायलाईट पाहूनही चाहते आजही टाळ्यांचा कडकडाट करतात.
हेही वाचा-
४ सज्जन भारतीय क्रिकेटर, ज्यांनी कधीही केले नाही दारुचे सेवन
–दारुमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले ५ क्रिकेटपटू, टीममधून गमवावी लागली होती जागा