जावेद मियाँदाद म्हणजे पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील दिग्गज फलंदाज. कधी-कधी मुद्दाम प्रतिस्पर्धांची खोड काढण्याऱ्या जावेदला ‘विदूषक’ म्हटले जायचे. परंतु त्याच्याइतका चाणाक्ष खेळाडूसुद्धा कुणी नव्हता. तो मानसिकरित्या इतका मजबूत होता की कोणताही दबाव असुद्या त्याच्यावर स्लेजिंगचा फरक पडला नाही. मग त्यात त्याने डेनिस लिलीसोबत घेतलेला पंगा असो किंवा चेतन शर्माला शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला सामना जिंकून देणे असो.
याच मियांदादसाठी आजचा 12 जूनचा दिवस खूप खास आहे. याच दिवशी 1957 साली जावेद मियाँदादचा कराचीत जन्म झाला होता. त्याने आपल्या पदार्पणातच न्युझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात शतक झळकावत 163 धावांची शानदार खेळी केली होती. मियाँदादचा समावेश अशा दोन खेळाडूंमध्ये केला जातो, ज्याची कसोटी क्रिकेटमधील सरासरी 50 च्या खाली गेलीच नाही. त्याने आपल्या चौथ्या कसोटी सामन्यात 206 धावा ठोकल्या होत्या. इतकंच नाही तर त्याने कसोटी क्रिकेट कारकिर्दीत तब्बल 23 शतके केली होती.
पंरतु क्रिकेट पंडितांचा नेहमी त्याला एक सल्ला असायचा की, त्याने फलंदाजी करताना यष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. कारण परदेशी मैदानावर तो 15 वेळा पायचीत झाला होता. परंतु पाकिस्तानात तो फक्त एकदाच पायचीत झाला होता. त्याच्या पिढीच्या महान फलंदाजांमध्ये त्याची गणना होते.
मियाँदादने विक्रमी 6 वेळा विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु नेहमी विवादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या मियाँदादने 1981 साली पर्थच्या मैदानावर रागाच्या भरात आपली बॅट डेनिस लिलीवर उगारली होती. त्यावेळी तो पाकिस्तानचा कर्णधार होता. अस म्हणतात की, मियाँदादला नेतृत्वपद दिल्यामुळे काही वरिष्ठ खेळाडू नाराज होते. इतकंच नाही तर 1992 च्या विश्वचषकात भारतीय यष्टीरक्षक किरण मोरेची नक्कल करत त्याने विदूषकी चाळे केले होते. निवृत्तीनंतर तो पाकिस्तानचा प्रशिक्षक देखील झाला होता.
मियाँदादने आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत 23 शतके आणि 43 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 8832 धावा केल्या होत्या. त्याच्या नावावर 223 एकदिवसीय सामन्यांत एकूण 7391 धावा आहेत. तसेच त्याने 402 प्रथम श्रेणी सामन्यांत तब्बल 28663 धावा केल्या आहेत. याबरोबरच कसोटीत 17 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 7 बळी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतावर परमाणू बॉम्ब टाकण्याची धमकी देणारा पाकिस्तानी क्रिकेटर, ठोकलीत ३१ शतके
मियाँदादने भारतीय क्रिकेटरला दिली होती धमकी; म्हणाले होते, ‘रुम नंबर सांग, तिथं येऊन मारतो’