बीसीसीआयनं 31 जुलै रोजी आयपीएल संघ मालकांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतर एक अहवाल समोर आला, ज्यामध्ये म्हटलंय की बीसीसीआय प्रत्येक फ्रँचायझीला 6 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी देऊ शकते. यामध्ये राईट टू मॅच कार्ड (RTM) चा पर्याय देखील खुला असेल. आता भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं आरटीएम कार्डच्या नियमावर आक्षेप घेतला आहे. याचा विरोध करताना त्यानं एक उदाहरणही दिलं.
रविचंद्रन अश्विननं राईट टू मॅचच्या नियमाला मूर्खपणाचं म्हटलं आहे. तो म्हणाला, “मला राईट टू मॅच नियमापेक्षा अधिक अन्यायकारक काही वाटत नाही. उदाहरणार्थ, एक खेळाडू सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे आणि त्याचा पगार सध्या 5 किंवा 6 कोटी रुपये आहे आणि सनरायझर्स हैदराबाद त्याला पुन्हा खरेदी करू इच्छित आहे. याचा अर्थ सनरायझर्स त्या खेळाडूसाठी 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह बोली सुरू करेल.”
अश्विन पुढे म्हणाला की, “केकेआर आणि मुंबईनं त्या खेळाडूवर बोली लावली तर ती 6 कोटी रुपयांपर्यंत जाते. अश्विन म्हणतो की जर मुंबईनं त्या खेळाडूला 6 कोटी रुपयांना खरेदी केलं, तर फक्त सनराझर्स तेवढी बोली लावून त्या खेळाडूला कायम ठेवू शकेल. येथे समस्या अशी आहे की सनराझर्स आनंदी असतील, परंतु केकेआर आणि मुंबई नाखूष असतील. अशा परिस्थितीत खेळाडूला योग्य मूल्य मिळणार नाही. दोन संघ एका खेळाडूसाठी बोली लावत असताना, सनरायझर्स लिलावात उडी घेतो आणि आपला खेळाडू आपल्याकडे परत करण्यास सांगतो. या नियमात फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहे,” असं अश्विननं स्पष्ट केलं.
वास्तविक, राईट टू मॅचची अंमलबजावणी बोली दरम्यान केली जाऊ शकते. समजा एखाद्या खेळाडूवर 5-6 कोटी रुपयांची बोली लावली गेली आणि खेळाडूच्या जुन्या संघाला त्याला कायम ठेवायचं असेल, तर तो संघ राईट टू मॅच कार्ड वापरून तेवढ्या रकमेची बोली लावून खेळाडूला कायम ठेवू शकतो.
हेही वाचा –
2025च्या आयपीएल हंगामात पुनरागमन करणार ‘हे’ 3 धुरंधर?
इंग्लंडच्या दिग्गजानं निवडले जगातील टाॅप-5 फलंदाज, पाचव्या क्रमांकावर ‘या’ खेळाडूला स्थान
धोनी आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार? आर अश्विनची प्रतिक्रिया चर्चेत