भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत आगामी रणजी मोसमात केरळ संघाकडून खेळताना दिसू शकतो. 13 सप्टेंबर 2020 ला त्याच्या बंदीचा कालावधी पूर्ण होणार आहे. त्यामुळे तो त्यानंतर क्रिकेट खेळताना दिसू शकतो.
हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार केरळ क्रिकेट असोसिशनने श्रीसंतला त्याच्या बंदीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संघात सामील करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याआधी श्रीसंतला त्याची तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल.
श्रीसंतवर बीसीसीआयने 2013 च्या आयपीएलमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे आजीवन बंदी घातली होती. त्याच्याबरोबरच अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांच्यावरही बंदी घालण्यात आली होती.
पण मार्च 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अनुशासन समीतीला श्रीसंतच्या बंदीचा कालावधी कमी करण्यास सांगितले होते. त्यामुळे 2019 मध्ये त्याच्या बंदीचा कालावधी 7 वर्षांचा करण्यात आला. त्यानुसार त्याच्या निलंबनाचे 6 वर्षे आधीच पूर्ण झाले असल्याने आता 13 सप्टेंबर 2020 ला त्याच्या बंदीच्या 7 वर्षांचा कालावधी पूर्ण होणार आहे.
याबद्दल श्रीसंत म्हणाला, ‘मला संधी दिल्याबद्दल मी केरळ क्रिकेट असोसिएशनचे खरोखर आभारी आहे. मी खेळात माझी तंदुरुस्ती आणि माझे वादळ परत सिद्ध करेन. सर्व वाद शांत करण्याची ही वेळ आहे.’
अलीकडेच केरळ क्रिकेट असोसिएशनने माजी वेगवान गोलंदाज टीनू योहानन यांची संघ प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. केरळ क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्रीथ नायर यांनी सांगितले की, त्याचे पुनरागमन हे केरळ संघाचे महत्त्वाचे शस्त्र ठरेल.
पण सध्या कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर रणजी ट्रॉफीच्या आयोजनाबाबत अद्याप बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण तरी श्रीसंत सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या केरळ संघाच्या शिबिराचा एक भाग असेल. केरळचा महत्त्वाचा गोलंदाज संदीप वॉरियर पुढील हंगामात तामिळनाडूकडून खेळणार आहे आणि त्यामुळे श्रीसंतला केरळ संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
श्रीसंतने भारताकडून खेळताना 27 कसोटीत 87 विकेट्स तर 53 वनडे सामन्यात 75 विकेट्स त्याने घेतल्या आहेत. तसेच तो 2007 च्या टी20 विश्वचषक आणि 2011 च्या वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
४ धावा देत ६ विकेट्स टीम इंडियाकडून घेण्याच्या ऐतिहासिक कामगिरीला झाली ६ वर्ष
बीसीसीआय आयसीसीतील तणाव वाढला! टी२० विश्वचषकावरुन सुरु झालेत वाद
२०११ विश्वचषक विजेत्या संघातील ५ असे हिरो, ज्यांचे योगदान फारसे कुणाला आठवत नाही