भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज श्रीसंत आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात निर्दोष सुटल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. रियालिटी शो पासून ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यापर्यंत तो नित्य आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून चाहत्यांशी संवाद साधत असतो. नुकतेच त्याने आपल्या इन्स्टाग्रामवरून आपला एकेकाळचा सहकारी फिरकीपटू हरभजन सिंग याच्या सोबतचे एक छायाचित्र पोस्ट केले असून, चाहत्यांनी यावर अनेक मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
श्रीसंतने पोस्ट केले छायाचित्र
श्रीसंतने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून हरभजन सिंग सोबतचे छायाचित्र पोस्ट केले. त्याने या छायाचित्राला ‘दिग्गज साथीदार भज्जीसोबत, एका शानदार सायंकाळसाठी धन्यवाद भज्जी. खूप आदर आणि प्रेम भज्जी पा’ असे कॅप्शन दिले आहे.
त्याने हे छायाचित्र पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी यावर अनेक मजेदार प्रतिक्रिया दिल्या. काही चाहत्यांनी तर त्याला २००८ मधील कानशिलात लगावलेल्या प्रकरणाची आठवण करून दिली. काहींनी तर त्याला हरभजनपासून सावध राहण्याचा देखील सल्ला दिला.
काय होते हे प्रकरण
आयपीएलच्या पहिल्या हंगामात हरभजन सिंग मुंबई इंडियन्सचे तर श्रीसंत पंजाबचे प्रतिनिधित्व करत होता. साखळी सामन्यात मुंबईवर विजय मिळवल्यानंतर श्रीसंतने काहीतरी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने हरभजन सिंगने त्याच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर श्रीसंत रडतानाचा व्हिडिओ समोर आलेला. या प्रकरणानंतर हरभजनवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली. मात्र, १४ वर्षानंतरही दोघांनी यावर विशेष स्पष्टीकरण दिले नाही. त्यांची मैत्री पुढेही तशीच राहिली.
श्रीसंतवर लागली होती बंदी
आयपीएल २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळत असताना श्रीसंतवर स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप केला गेला होता. त्यानंतर त्याच्यावर ७ वर्षांची बंदी लादली गेलेली. या मधल्या काळात तो प्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉसमध्ये ही सहभागी झालेला. त्यानंतर, मागील वर्षी त्याने केरळसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्याने आयपीएल लिलावातही आपले नाव समाविष्ट केले होते. मात्र, कोणीही त्याला संघात सामील करून घेण्यास रस दाखवला नाही.






