भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत सध्या चर्चेत आहे. आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी त्याने आपले नाव नोंदविले होते. मात्र, अंतिम यादीमध्ये नाव न आल्याने त्याची निराशा झाली. सोबतच त्याचे चाहते देखील हताश झाले. आता या प्रकरणानंतर, स्वतः श्रीसंतने पुढे येत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
लिलावातून डावलले गेले श्रीसंतला
आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी तब्बल १,०९७ क्रिकेटपटूंनी नावनोंदणी केली होती. त्यानंतर, ११ फेब्रुवारी रोजी या लिलावासाठीची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये, २९२ खेळाडूंना स्थान मिळाले. विशेष म्हणजे, आठ वर्षानंतर आयपीएल लिलावात सहभागी होत असलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत याला या यादीमध्ये स्थान मिळाले नाही. ही यादी आयपीएलच्या सर्व आठ फ्रॅंचाईजी मिळून अंतिम करतात. आयपीएल २०२१ चा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडेल.
श्रीसंतने दिली प्रतिक्रिया
लिलावात डावलला गेल्याने श्रीसंत काहीसा निराश झाला. आपल्या इंस्टाग्रामवरून व्हिडिओ शेअर करताना त्याने म्हटले, “मला आशा वाटते की मला ख्रिस गेलसारखे एखादा संघ सत्राच्या मध्यात आमंत्रित करेल. त्यावेळी त्याला कोणीही खरेदी केले नव्हते. मात्र, त्यानंतर काय झाले हे सर्वांना माहीत आहे.”
वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याला २०११ लिलावावेळी कोणत्याही संघांनी खरेदी केले नव्हते. परंतु, डर्क नॅनेस दुखापतग्रस्त झाल्याने त्याला संधी मिळाली यापुढे त्याने ऐतिहासिक कामगिरी करत, टी२० क्रिकेटचा बादशाह असे बिरुद मिळवले.
आठ वर्षानंतर श्रीसंतने केले पुनरागमन
आयपीएल २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत असताना श्रीसंत स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला होता. त्यानंतर, त्याला सात वर्षे क्रिकेट खेळण्यापासून निलंबित करण्यात आले होते. मागील वर्षी बंदीचा कालावधी संपल्यानंतर, त्याने चालू वर्षी पुनरागमन केले. नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने केरळचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत पाच सामने खेळताना त्याला ४ बळी मिळविण्यात यश आले. सध्या तो केरळ क्रिकेट संघासोबत वायनाड येथील सराव शिबिरात सहभागी झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कट रचला! रुटचा गेम खल्लास, ‘या’ भारतीय खेळाडूने सांगितला रुटला तंबूत धाडायचा फाॅर्मुला
एकाच वनडे सामन्यात नाबाद २३२ धावा अन् ५ बळी घेणारी ‘फ्युचर सुपरस्टार’
नव्या फिटनेस टेस्टमध्ये ‘हे’ ६ क्रिकेटपटू फेल; भारतीय संघात स्थान मिळवणे होणार कठीण