मॅच फिक्सिंगच्या आरोपातून मुक्त झाल्यानंतर, श्रीसंतला वेध लागले आहेत ते आयपीएल खेळण्याचे. रणजी मधून पुनरागमन करताना तो पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल लिलावात देखील सहभागी होऊ शकतो. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाईव्ह घेऊन तो ज्या संघासाठी खेळू इच्छितो, त्या संघाचे नाव त्याने जाहीर केले आहे.
श्रीसंतने आपला शेवटचा आयपीएल सामना हा २०१३ मध्ये खेळला होता. त्यानंतर स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली तो तब्बल सात वर्ष क्रिकेट पासून दूर होता. श्रीसंतने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन, पंजाब कोची टस्कर्स केरला आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलच्या ४४ सामन्यात त्याने ४० बळी घेतले आहेत.
‘या’ संघासाठी खेळताना मला आनंद होईल
श्रीसंत आपल्या इंस्टाग्रामवरून लाईव्ह येत म्हणाला,” सचिन तेंडुलकर यांच्याप्रती असलेल्या प्रेम आणि आदरामुळे मला मुंबई इंडियन्स संघाचा भाग व्हायला आवडेल. मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये खूप काही शिकण्यासारखे असेल. तरीही जो संघ मला खरेदी करेल त्या संघासाठी शंभर टक्के योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल.”
यावर्षीदेखील खेळण्याची संधी मिळू शकतो
यावर्षी Covid-19 या पार्श्वभूमीवर काही विदेशी खेळाडू खेळण्याची शक्यता कमी आहे म्हणून आपल्याला संधी मिळू शकते अशी श्रीसंतला आशा आहे. त्याविषयी बोलताना तो म्हणतो,” सध्याच्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही विदेशी खेळाडू आपले नाव आयपीएल मधून मागे घेऊ शकतात आणि तेव्हा काही अधिक भारतीय खेळाडूंना याचा लाभ मिळू शकतो. तसे झाले तर मलासुद्धा खेळण्याची संधी मिळू शकते. मुंबई इंडियन्स सोबतच मला धोनीभाईसोबत सीएसके आणि आरसीबीच्या संघात जायला आवडेल.






