आयपीएल 2021 मधील बुधवारी (14 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार डेविज वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करीता उतरलेल्या आरसीबी संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून 149 धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या हैदराबाद संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 143 धावा करता आल्या. त्यामुळे सनरायजर्स हैदराबादला सहा धावांनी पराभव पत्करावा लागला.
या पराभवानंतर हैदराबाद संघाचा कर्णधार वॉर्नरने पराभवाचे खापर दोन खेळाडूंच्या माथी फोडले आहे.
या सामन्यात हैदराबाद संघाला फलंदाजी करताना एकावेळी 30 चेंडूंत केवळ 42 धावांची गरज होती. तसेच त्यांचे 9 गडी खेळायचेही बाकी होते. त्यामुळे हैदराबाद हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण फिरकीपटू शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर क्रॉस शॉट खेळून मनीष पांडे आणि जॉनी बेअरस्टो बाद झाले.
सामन्यानंतर बोलताना वॉर्नरने म्हटले की, “आमच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत विरोधकांना मोठ्या धावा काढण्यापासून रोखले. तसेच मॅक्सवेलने शानदार फलंदाजी करत आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी केली. आमच्याकडे पण दोन फलंदाज होते ज्यांच्यावर आमच्या नजरा होत्या. पण ते अपयशी ठरले.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “आम्हाला चांगली भागीदारी करून योग्य फटके खेळण्याची गरज होती. परंतु या ठिकाणी क्रॉस शॉट योग्य नसतानाही आम्ही ती चूक केली. त्यामुळे आता हे सर्व पाहून खरोखर खूप वाईट वाटते. पण आता आम्हाला आगामी सामन्यांमध्ये कोणत्या पद्धतीने खेळायचे हे माहिती झाले आहे. पहिल्या सहा षटकांत कमीतकमी गडी गमावून नंतर साधे क्रिकेट खेळण्याची गरज आहे. त्यामुळे चेपॉकमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने चारही सामने जिंकले पाहिजेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यातही आपल्याला हीच गोष्ट पाहायला मिळाली.”
महत्त्वाच्या बातम्या-
RCBvSRH: चुरसीच्या लढतीत विराटसेना ठरली यशस्वी, कर्णधाराने ‘या’ २ खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय
शानदार विजयानंतर कॅप्टन कोहलीच्या आनंदावर विरजण, ‘त्या’ असभ्य कृतीमुळे सामना रेफरींनी फटकारले
पांडेजींची कमाल! सूर मारत टिपला वॉशिंग्टन सुंदरचा लाजवाब झेल, पाहा व्हिडिओ