भारत सध्या कोरोना व्हायरस विरुद्धची लढाई लढत आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट क्षेत्रातूनही अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत आता यात सनरायझर्स हैदराबादचेही नाव जोडले गेले आहे. हैदराबादने मोठी रक्कम कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत दान केली आहे.
हैदराबाद संघाची मालकी असलेले सन टीव्ही नेटवर्क ३० कोटी रुपये दान करणार असल्याची माहिती हैदराबाद संघाने प्रसिद्धीपत्रक जाहीर करत दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत प्रभावित झालेल्यासांठी सन टीव्ही नेटवर्क एकूण ३० कोटी रुपयांची देणगी देत आहे. भारतातील विविध राज्यांत सुरु असलेल्या अनेक उपक्रमांवर हा खर्च केला जाईल. त्यात पुढील गोष्टींचा समावेश असेल. १. भारत सरकार आणि राज्य सरकारांनी सुरू केलेल्या विविध कार्यक्रमांना देणगी. २. ऑक्सिजन सिलेंडर, औषधे इत्यादी पुरवित असलेल्या स्वयंसेवी संस्थांशी भागीदारी करणे.’
Sun TV (SunRisers Hyderabad) is donating Rs.30 crores to provide relief to those affected by the second wave of the Covid-19 pandemic. pic.twitter.com/P6Fez9DuLo
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 10, 2021
यापूर्वी क्रिकेट क्षेत्रातून मदतीचा हात
यापूर्वीदेखील अनेक क्रिकेटपटू यावेळी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदतीसाठी पुढे आले आहेत. यात पॅट कमिन्स, ब्रेट ली, निकोलस पूरन, जेसन बेऱ्हेंडॉर्फ अशा परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच भारतीय खेळाडूंमध्येही अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा एक मोहिम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत ७ कोटी रुपयांची मदत करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी त्यांनी २ कोटींचे दान दिले आहे. याच मोहिमेत युजवेंद्र चहलनेही योगदान दिले आहे. याशिवाय हार्दिक आणि कृणाल पंड्या यांनी २०० ऑक्सिजन संचांची मदत केली आहे.
याशिवाय रिषभ पंत, सचिन तेंडुलकर, इरफान आणि युसुफ पठाण, गौतम गंभीर, जयदेव उनाडकट, शिखर धवन, लक्ष्मीरतन शुक्ला, आर अश्विन अशा अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
एवढेच नाही तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि एस्टोनिया क्रिकेट बोर्डांनींही भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान दिले आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स अशा आयपीएलमधील अनेक संघांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आनंदाची बातमी! केकेआरचे कोरोना पॉझिटिव्ह असलेले ‘हे’ दोन खेळाडू परतले घरी
आयपीएल स्थगित होणे ‘या’ संघांना ठरणार फायदेशीर? ४ दिग्गज दुखापतीतून सावरुन करु शकतात पुनरागमन