चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २० वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर रोमांचकारी झालेल्या या सामन्यात दिल्लीने संघाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.
अशी झाली सुपर ओव्हर
सुपर ओव्हरमध्ये हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ७ धावा करत दिल्लीसमोर ८ धावांचे आव्हान ठेवले होते. सुपरओव्हरमध्ये हैदराबादकडून केन विलियम्सन आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फलंदाजी केली. तर दिल्लीकडून अक्षर पटेलने गोलंदाजी केली.
प्रतिउत्तरादाखल, दिल्लीकडून रिषभ पंत आणि शिखर धवन फलंदाजीसाठी उतरले. त्यांनी ६ चेंडूत ८ धावा करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबादकडून राशिद खानने गोलंदाजी केली.
केन विलियम्सनच्या अर्धशतकामुळे हैदराबादला बरोबरी साधण्यात यश
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. त्यानुसार दिल्लीने २० षटकात ४ बाद १५९ धावा करत हैदराबादला १६० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकाच हैदराबादलाही ७ बाद १५९ धावाच करता आल्या. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवली.
हैदराबादकडून १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीला फलंदाजीसाठी डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो फलंदाजीसाठी उतरले होते. या दोघांनीही हैदराबादला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, वॉर्नर चांगल्या सुरुवातीनंतरही केवळ ६ धावांवर चौथ्या षटकात दुर्दैवीरित्या धावबाद झाला. काहीवेळाने १८ चेंडूत ३८ धावा करणारा बेअरस्टो ६ व्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर शिखर धवनकडे झेल देऊन बाद झाला.
त्यानंतर नियमित कालांतराने विराट सिंग ४ धावांवर तर केदार जाधव ९ धावांवर बाद झाले. त्यांच्यापाठोपाठ १७ व्या षटकात अभिषेक शर्मा आणि राशिद खान हे देखील अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर लागोपाठच्या चेंडूंवर स्वस्तात बाद झाले. विजय शंकर देखील ८ धावा करुन बाद झाला.
असे असले तरी एका बाजूने केन विलियम्सनने डाव सावरला होता. त्याने एकाकी झुंज देत हैदराबादच्या विजयाच्या आशा कायम ठेवत अर्धशतकही पूर्ण केले. अखेर विलियम्सनला शेवटच्या दोन षटकात जगदीश सुचितने चांगली साथ दिली. मात्र अखेरच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज असताना विलियम्सन आणि सुचितला १५ धावाच करता आल्या. त्यामुळे सामन्यात बरोबरी झाली. विलियम्सनने ५१ चेंडूत ८ चौकारांसह ६६ नाबाद धावा केल्या. तर जगदीश सुचित ६ चेंडूत १४ धावांवर नाबाद राहिला.
दिल्लीकडून आवेश खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेलने २ आणि अमित मिश्राने १ विकेट घेतली.
पृथ्वी शॉचे अर्धशतक
दिल्लीकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉने सलामीला दमदार सुरुवात केली होती. त्यांनी ८१ धावांची सलामी दिली. या दोघांची जोडी वरचढ ठरत असतानाच शिखर धवन २६ चेंडूत २८ धावांवर राशिद खानच्या गोलंदाजीवर ११ व्या षटकात त्रिफळाचीत झाला. तर पाठोपाठ १२ व्या षटकात शॉ धावबाद झाला. शॉने आक्रमक खेळताना ३९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ५३ धावांची खेळी केली.
त्यानंतर कर्णधार रिषभ पंत आणि स्टिव्ह स्मिथने अर्धशतकी भागीदारी रचत दिल्लीचा डाव संयमाने पुढे नेला. मात्र ही भागीदारी रंगत असतानाच पंत ३७ धावांवर सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर १९ व्या षटकात बाद झाला. त्यामुळे त्यांची ५८ धावांची भागीदारी तुटली. पाठोपाठ शिमरॉन हेटमायर देखील त्याच षटकात १ धाव करुन बाद झाला.
अखेरच्या षटकात स्टिव्ह स्मिथने १ चौकार आणि १ षटकारासह दिल्लीला १५९ धावांपर्यंत पोहचवले. स्मिथ २५ चेंडूत ३४ धावांवर नाबाद राहिला. तर मार्कस स्टॉयनिस २ धावांवर नाबाद राहिला.
हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच राशिद खानने १ विकेट घेतली.
दिल्ली संघाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात दिल्लीने नुकताच कोरोनाला मात दिलेल्या अक्षर पटेलला संधी दिली आहे. त्यामुळे ललित यादवला बाहेर बसावे लागले आहे. तर हैदराबादने भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्याने जगदीश सुचितला संधी दिली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ
सनरायझर्स हैदराबाद: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), केन विलियम्सन, विराट सिंग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, राशिद खान, जगदेशा सुचित, खलील अहमद, सिद्धार्थ कौल.
दिल्ली कॅपिटलस: पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्हन स्मिथ, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, आवेश खान.