भारत अ (इंडिया ए) संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यामधील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा निकाल रविवारी (५ जुलै) लागला. यामध्ये भारताने ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखाली खेळताना श्रीलंकेचा १० विकेट्स राखत पराभव केला आहे. याबरोबर दोन सामन्यांची ही मालिका १-० अशी जिंकली आहे. भारताच्या या धमाकेदार विजयाचे शिल्पकार साई सुदर्शन (Sai Sudharsan) आणि गुरनूर ब्रार (Gurnoor Brar) ठरले.
गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली आणि यजमान संघाला ३६६ धावसंख्येवर रोखले. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ९ विकेट्स गमावत ५४३ धावा केल्या होत्या. त्यामध्ये सुदर्शनने १६८ धावांची खेळी केली आणि भारताने १७७ धावांची आघाडी घेतली.
भारताच्या पहिल्या डावात सुदर्शनसोबत भारताच्या बाकी फलंदाजांनीही विशेष कामगिरी केली. देवदत्त पड्डीकलने ९४ धावा, जुरेलने ५३ धावा आणि सारांश जैन ७० धावा करत नाबाद राहिला. तसेच शेख रशीदनेही ४५ धावा केल्या.
श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात पुन्हा एकदा भारताने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे श्रीलंकेचा दुसरा डाव २०९ धावसंख्येवरच संपुष्टात आला आणि भारताला विजयासाठी केवळ ३३ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताच्या दुसऱ्या डावात सुदर्शन २५ धावा आणि अमन मोखाडे ११ धावा करत नाबाद राहिले.
गुरनूर ब्रारच्या १० विकेट्स
भारतीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने या सामन्यात लक्षवेधी कामगिरी केली. त्याने श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याची ही कामगिरी भारतासाठी जमेची बाजू आहे, कारण भारत इंग्लंड दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार असून संघात गुरनूरचा समावेश आहे.
सारांशचीही कामगिरी अष्टपैलू राहिली. त्याने भारतासाठी पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात २ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तो गुरनूरनंतर भारतासाठी दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. (SL A vs IND A 2nd Unofficial Test Result)






