न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेच्या गॅले इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमान संघानं 63 धावांनी विजय मिळवला. 18 सप्टेंबरला सुरू झालेला कसोटी सामना 23 सप्टेंबरला म्हणजेच पाचव्या दिवशी नाही तर सहाव्या दिवशी संपला कारण एक दिवस श्रीलंकेतील राष्ट्रपती निवडणुकांसाठी राखीव ठेवण्यात आला होता.
सामन्याच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेला विजयासाठी दोन विकेट्सची आवश्यकता होती. तर न्यूझीलंडला 68 धावा करायच्या होत्या. सर्वांच्या नजरा न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रवींद्रवर होत्या. तो 91 धावा करून नाबाद परतला होता. त्याच्यासोब एजाज पटेल शून्यावर खेळत होता. मात्र सामन्याच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेचा फिरकीपटू प्रभात जयसूर्यानं आपली जादू दाखवली. त्यानं आधी रचिन आणि नंतर विल्यम ओरुरकेला बाद केलं. अशाप्रकारे न्यूझीलंडचा संघ 211 धावांवर ऑलआऊट झाला.
तत्पूर्वी, श्रीलंकेनं पहिल्या डावात 305 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, किवी संघानं पहिल्या डावात 340 धावा केल्या आणि 35 धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेनं दुसऱ्या डावात 309 धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य ठेवलं. श्रीलंकेसाठी पहिल्या डावात चार बळी घेणाऱ्या प्रभातनं दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. दुसऱ्या डावात श्रीलंकेसाठी दिमुथ करुणारत्नेनं 83 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. तर दिनेश चंडिमलनं 61 आणि अँजेलो मॅथ्यूजनं 50 धावा केल्या.
न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात रचिन रवींद्रनं 92 धावांचं योगदान दिलं. याशिवाय केन विल्यमसननं 30 धावांची खेळी केली. टॉम ब्लंडेलने 30 धावा तर टॉम लॅथमनं 28 धावा केल्या. या चौघांशिवाय दुसऱ्या डावात एकाही किवी फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. श्रीलंकेकडून एकूण नऊ विकेट घेणाऱ्या प्रभात जयसूर्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
हेही वाचा –
6 चौकार अन् 7 षटकार…मैदानावर पुन्हा आलं निकोलस पूरनचं वादळ!
भारत-बांगलादेश दुसरी कसोटी कधी आणि कुठे खेळली जाईल? टीव्हीवर लाईव्ह कुठे पाहायचा सामना?
दक्षिण आफ्रिकेनं लाज राखली, अफगाणिस्ताननं 3-0 ने केला असता क्लीन स्वीप