गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका क्रिकेटला मैदानातील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील घटनांमुळे मोठे धक्के बसत आहेत. नुकतेच त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंनी कमी वयातच निवृत्ती जाहीर केल्याने सर्वांना धक्का बसला होता. त्यामुळे अखेर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने निवृत्ती घेण्याचा विचार करत असलेल्या खेळाडूसाठी कठोर नियम लागू केले आहेत.
गेल्या काही दिवसात श्रीलंकेचे दनुष्का गुणतिलका आणि भानुका राजपक्षे यांनी तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे अशाही चर्चा सुरु झाल्या की अन्य काही खेळाडूही निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. पण, असे असतानाच अविष्का फर्नांडोने सोशल मीडियावर त्याच्या निवृत्तीच्या अफवा असल्याचे सांगितले होते.
पण, या घटनांमुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कठोर नियम करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेटने नियम केला आहे की, राष्ट्रीय संघातील खेळाडूंना निवृत्तीच्या तीन महिन्यांआधी नोटीस द्यावी लागेल. तसेच विदेशी टी२० लीगमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी निवृत्तीनंतर सहा महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. एवढेच नाही, तर लंका प्रीमीयर लीगमध्ये खेळण्यासाठी निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंना ८० टक्के देशांतर्गत क्रिकेट सामने खेळावे लागणार आहेत.
गेल्या काही महिन्यांत विविध कारणांनी श्रीलंकन खेळाडूंनी निवृत्ती घेतल्या आहेत. काही खेळाडूंनी बोर्डाचे नियम न पटल्याने, तर काहींनी अमेरिेकेला जाण्याच्या कारणांनी निवृत्ती घेतली. नुकतीच निवृत्ती घेतलेल्या भानुका राजपक्षेने श्रीलंका क्रिकेट बोर्डाने लागू केलेले फिटनेस टेस्टचे नियम न पटल्याने निवृत्ती जाहीर केली आहे.
गेल्या वर्षी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने फिटनेस टेस्टचे काही नवीन नियम केले आहेत. या फिटनेस टेस्टमध्ये खेळाडूंना २ किलोमीटर धावायचे आहे. जे खेळाडू हे दोन किलोमीटरचे अंतर ८.१० मिनिटात पार करतील त्यांची संघात निवड केली जाऊ शकते आणि त्यांना आर्थिक नुकसानही होणार नाही. तर दुसरीकडे जे खेळाडू हे अंतर कापण्यासाठी ८.५५ पेक्षा अधिक वेळ घेतील त्यांची संघात निवड केली जाणार नाही.
बोर्डच्या नियमांप्रमाणे ज्या खेळाडूंना हे २ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ८.३५ ते ८.५५ मिनिटे लागतील, त्यांना मिळणाऱ्या वेतनापैकी काही भाग बोर्ड कापून घेणार आहे आणि हे खेळाडूं संघात समील होऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
सुदैव म्हणतात ते हेच! कॅच सुटला, षटकारही नाही मारला अन् नो बॉलही नाही, तरी फलंदाजाला मिळाल्या ७ धावा
केपटाऊन कसोटीत विराटने ‘एवढ्या’ धावा केल्यावर मोडणार प्रशिक्षक राहुल द्रविडचा विक्रम