---Advertisement---

परेराच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेचा भारतावर ५ विकेट्सने विजय

---Advertisement---

कोलंबो। श्रीलंकेत आज पासून सुरु झालेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात श्रीलंकेने भारताविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात कुशल परेराने आक्रमक अर्धशतक झळकावताना श्रीलंकेच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २० षटकात १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान श्रीलंकेने १८.३ षटकातच पूर्ण केले. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली होती. त्यांचा सलामीवीर फलंदाज कुशल मेंडिस(११) लवकर बाद झाला.

मात्र त्यानंतर खेळायला आलेल्या श्रीलंकेच्या कुशल परेराने आक्रमक खेळ करायला सुरुवात केली. त्याला सलामीवीर दनुष्का गुनाथिलाकाने भक्कम साथ देताना दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी रचली. ही जोडी फोडण्यात उनाडकटला यश आले. त्याने गुनाथिलाकाला(१९) रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले.

त्यानंतर मात्र बाकी फलंदाजांनी परेराला हवी तशी साथ दिली नाही. अखेर आक्रमक खेळणाऱ्या परेराला वॉशिंग्टन सुंदरने बाद करत त्याचा झंजावात थांबवला. परेराने ४ षटकार आणि ६ चौकारांची बरसात करताना ३७ चेंडूत ६६ धावांची खेळी केली.

श्रीलंकेकडून बाकी फलंदाजांपैकी दिनेश चंडिमल(१४), उपुल थरंगा(१७), दसून शनका(१५*), थिसारा परेरा(२२*) यांनी धावा केल्या.

भारताकडून युजवेंद्र चहल(२/३७), वॉशिंग्टन सुंदर(२/२८) आणि जयदेव उनाडकटने(१/३५) विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी धडाकेबाज सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या शानदार अर्धशतकच्या जोरावर भारताने २० षटकात ५ बाद १७४ धावा केल्या होत्या. भारताचीही सुरवात खराब झाली होती. प्रभारी कर्णधार रोहित शर्मा आज शून्य धावेवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ लगेचच सुरेश रैनाही(१) बाद झाल्याने भारताची अवस्था २ बाद ९ धावा अशी झाली.

यानंतर मात्र शिखर आणि मनीष पांडेने भारताचा डाव सांभाळला. मनीषने शिखरची भक्कम साथ दिली. मात्र मनीष ३५ चेंडूत ३७ धावांवर असताना जीवन मेंडिसने त्याला बाद करत ही जोडी फोडली. शिखर आणि मनीष या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचली.

त्यानंतर रिषभ पंतने शिखरची साथ देण्याचा प्रयन्त केला. पण शिखरची विकेट घेण्यात गुनाथिलाकाला यश आले. शिखरने आज ४९ चेंडूत ९० धावांची दमदार अर्धशतकी खेळी करताना ६ चौकार आणि ६ षटकारांची आतिषबाजी केली.

मात्र त्यानंतर पंत(२३) आणि दिनेश कार्तिकने(१३*) मिळून अखेर भारताला १७४ धावांचा टप्पा गाठून दिला. मात्र डावातील अखेरच्या चेंडूवर दुश्मनथा चमिराच्या गोलंदाजीवर पंत बाद झाला.

श्रीलंकेकडून जीवन मेंडिस(१/२१), दुश्मनथा चमिरा(२/३३), दनुष्का गुनाथिलाका(१/१६) आणि नुवान प्रदीप(१/३८) यांनी विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment