श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो परेराने नोंदेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब संघाकडून खेळताना सिंहालीज स्पोर्ट्स क्लब विरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यात दोन्ही डावात द्विशतके करत मोठा इतिहास घडवला आहे.
जवळ जवळ 200 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा तो केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे. त्याने 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या सामन्यात पहिल्या डावात 203 चेंडूत 201 धावा केल्या. यात त्याने 20 चौकार आणि एक षटकार मारला. तर दुसऱ्या डावात 268 चेंडूत 231 धावा केल्या.
याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका सामन्यात दोन द्विशतके करण्याचा पराक्रम पहिल्यांदा 1938 मध्ये आर्थर फॅग यांनी केला होता. त्यांनी केन्ट संघाकडून खेळताना एसेक्स विरुद्ध कोलचेस्टर येथे झालेल्या सामन्यात पहिल्या डावात 244 आणि नाबाद 202 धावा केल्या होत्या.
नोंदेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब विरुद्ध सिंहालीज स्पोर्ट्स क्लब यांच्यातील हा सामना अनिर्णित राहिला आहे.
28 वर्षीय परेराने श्रीलंकेकडून 4 वनडे सामने खेळले आहेत तर 2 टी20 सामने खेळले आहेत. त्याने श्रीलंकेकडून शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 31 ऑगस्ट 2016 ला खेळला आहे. तसेच त्याने आत्तापर्यंत 97 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्याने 47.54 च्या सरासरीने 6941 धावा केल्या आहेत. यात त्याने 18 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडिया विरुद्धच्या टी२० मालिकेला न्यूझीलंडचा हा स्पोटक खेळाडू मुकणार, जाणून घ्या कारण
–पुणेकर केदार जाधवसाठी एमएस धोनीचा मराठमोळा अंदाज, पहा व्हिडिओ
–मोहम्मद शमी अशी कामगिरी करणारा ठरला केवळ तिसराच वेगवान भारतीय गोलंदाज