श्रीलंका संघ सध्या इंग्लंड दौर्यावर असून तिथे तीन टी२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका ते खेळत आहेत. यातील तीन टी२० आणि एक वनडे सामना पार पडला असून या चारही सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मात्र केवळ मैदानातच नाही तर मैदानाबाहेर देखील त्यांच्यामागे साडेसाती लागली आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचे काही खेळाडू बायो बबलचे नियम तोडून इंग्लंडच्या रस्त्यांवर दिसले होते. आता त्यांच्यावर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
बोर्डाने उचलली कठोर पावले
इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या टी२० सामन्यानंतर श्रीलंकन संघातील कुशल मेंडिस, निरोशन डिकेवाला आणि दनुष्का गुणतिलका हे तीन खेळाडू डरहॅमच्या रस्त्यांवर फिरतांना आढळले होते. विशेष म्हणजे बायो बबलचे नियम लागू असून देखील हे नियम तोडून या खेळाडूंनी हा प्रकार केला होता. या प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने तात्काळ निर्णय घेत या तीन खेळाडूंना निलंबित केले होते. तसेच तातडीने मायदेशी येण्याचे आदेश दिले होते.
यानंतर या घटनेची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर श्रीलंका बोर्डाने या खेळाडूंवर कारवाई केली आहे. यानुसार या तिन्ही खेळाडूंना पुढील एक वर्षासाठी सगळया प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निलंबित करण्याचा निर्णय २९ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे आता हे खेळाडू भारताविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळू शकणार नाहीत. तसेच यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार्या टी२० विश्वचषकात देखील ते भाग घेऊ शकणार नाहीत.
श्रीलंकेची बिकट परिस्थिती
साल २०२३ मध्ये भारतात होणार्या वनडे विश्वचषकात देखील श्रीलंकेला सरळ प्रवेश मिळवणे अशक्य दिसते आहे. आयसीसीच्या विश्वचषक सुपर लीगच्या गुणतालिकेत १२ संघांमध्ये श्रीलंका सगळ्यात तळाच्या स्थानावर आहे. त्यातच तीन वरिष्ठ खेळाडूंना निलंबित केल्याने त्यांच्यासाठी हे आव्हान अजूनच खडतर झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताचा ‘हा’ खेळाडू जायबंदी, पहिल्या कसोटीलाही मुकण्याची शक्यता
“हा आहे धोनी आणि विराटच्या नेतृत्वात फरक”, माजी भारतीय खेळाडूने मांडली परखड भूमिका
मित्रांसह युरो कप २०२० चा सामना पाहायला गेला रिषभ पंत, पण ‘या’ कारणामुळे चाहत्यांनी केले ट्रोल