भारतीय संघ सध्या बांगलादेशविरूद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सराव करत आहे. तत्पूर्वी शेवटच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताला श्रीलंकेकडून 2-0 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत श्रीलंकेने उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीचे प्रदर्शन दाखवले होते. दरम्यान आता आयसीसीने ‘प्लेयर ऑफ द मंथ’ची घोषणा केली आहे. त्यामध्ये भारतीय संघाविरूद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या दुनिथ वेल्लालगेला (Dunith Wellalage) ‘प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
दुनिथला ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार यानंतर आयसीसीने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपले मत मांडत आहेत. तो म्हणाला, “या पुरस्कारानंतर मला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. मी माझ्या देशासाठी नेहमीच 100 टक्के देईन. तथापि, मी माझ्या सहकारी खेळाडूंचे आभार मानू इच्छितो, ज्यांच्यामुळे मी आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार जिंकू शकलो.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “माझ्या सहकारी खेळाडूंव्यतिरिक्त मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि नातेवाईकांचे आभार मानू इच्छितो. मला विश्वास आहे की माझ्या कामगिरीने सर्वजण खूप खूश होतील, कठीण काळात मला सर्वांची साथ मिळाली. माझ्यासारख्या युवा खेळाडूला आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार मिळणे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे युवा खेळाडूंचे मनोबल वाढेल.”
दुनिथच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने श्रीलंकेसाठी 1 कसोटी आणि 24 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 1 कसोटी सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण 24 एकदिवसीय सामन्यात त्याने 30च्या सरासरीने 30 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 5.34 राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा! ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन
सोनी-स्टारवर दिसणार नाही भारत-बांगलादेश मालिका, या चॅनलवर पाहा फ्री!
फक्त 58 धावा आणि किंग कोहली रचणार इतिहास! सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड धोक्यात