आशिया चषक 2022 च्या सुपर फोरमधील तिसरा सामना भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पार पडला. दुबई येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत भारतीय संघाला 6 गडी राखून पराभूत करत अंतिम फेरीतील आपली जागा जवळपास नक्की केली. आधी गोलंदाजांनी केलेले पुनरागमन व दोन्ही सलामीवीरांनी दिलेल्या 97 धावांच्या सलामीने श्रीलंकेचा विजय सुकर झाला.
Sri Lanka seal a tense win to top Super Four table in #AsiaCup2022 🔥#INDvSL | 📝 Scorecard: https://t.co/914FlwDKK0 pic.twitter.com/t3lhQ5PE9k
— ICC (@ICC) September 6, 2022
नाणेफेक जिंकून श्रीलंकेने भारतीय संघाला फलंदाजासाठी आमंत्रित केले होते. मात्र, केएल राहुल व विराट कोहली यांना झटपट बाद करत श्रीलंकेने शानदार केली. तिसऱ्या गड्यासाठी कर्णधार रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी 97 धावा करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. रोहितने 71 तर सूर्यकुमार यादवने 34 धावा केल्या. हार्दिक पंड्या व रिषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर, रविचंद्रन अश्विनने महत्त्वपूर्ण 15 धावांचे योगदान देत संघाला 8 बाद 173 पर्यंत मजल मारून दिली. श्रीलंकेसाठी मधुशंका याने तीन बळी मिळवले.
भारताने दिलेले 174 धावांचे आव्हान पेलवताना श्रीलंकेला झकास सुरुवात मिळाली. पथुम निसंका व कुसल मेंडीस यांनी 97 धावांची सलामी दिली. निसंकाने यादरम्यान आपले अर्धशतक पूर्ण केले. निसंका व असलंका यांना एकाच षटकात बाद करत युजवेंद्र चहलने भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. दुसरा सलामीवीर कुसल मेंडीसदेखील अर्धशतक करून बाद झाला. एकापाठोपाठ चार बळी गेल्यानंतर जबाबदारी कर्णधार दसून शनाका व अनुभवी भानुका राजपक्षे यांनी उचलली. शनाकाने भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. अखेरच्या दोन षटकात 21 धावा हव्या असताना भुवनेश्वर कुमारच्या षटकात 14 धावा केल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी 7 धावांची गरज असताना एक चेंडू राखून श्रीलंकेने सामना आपल्या नावे केला.