श्रीलंकेच्या डबघाईला गेलेल्या आर्थिक संकटाच्या परिस्थितीमुळे आशिया चषक २०२२ चे आयोजनस्थळ बदलण्यात आले आहे. आता ही स्पर्धा श्रीलंकेऐवजी संयुक्त अमिरातीत (यूएई) होणार आहे. आयोजनस्थळ म्हणून युएईची निवड झाली असली तरी, आशिया चषकाचे आयोजक अजूनही श्रीलंका क्रिकेट बोर्डच आहे. अशा परिस्थितीत, या महत्त्वाच्या बदलामुळे श्रीलंका क्रिकेटला फटका बसेल, अशी अपेक्षा होती. परंतु माध्यमांतील वृत्तानुसार, आयोजनस्थळ बदलूनही श्रीलंका क्रिकेट बोर्डाला सुमारे ६ मिलियन अमेरिकन डॉलर्सचा नफा अपेक्षित आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऍश्ले डिसिल्वा यांनी आशिया चषकाच्या आयोजन स्थळाबाबत बोलताना अनेक गोष्टींची माहिती दिली. श्रीलंकेतून स्पर्धा दुसरीकडे हलवणे निराशाजनक असल्याचे त्यांनी म्हटले. ते म्हणाले,
“देशात सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे आयोजनस्थळ बदलणे आम्हाला भाग पडले. श्रीलंकेत या स्पर्धेचे आयोजन केले असते तर, पर्यटनाच्या माध्यमातून श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला असता. देशाचे नावही मोठे झाले असते. श्रीलंकेला अद्यापही प्रत्येक सहभागी संघाकडून २.५ मिलियन डॉलर्स होस्टिंग फी, १.५ मिलियन डॉलर्स तिकीट विक्री फी आणि २ मिलियन डॉलर्स फी मिळेल. म्हणजेच, मंडळाला सुमारे ६ मिलियन डॉलर्स कमावण्याची अपेक्षा आहे.”
श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयोजित केलेल्या सर्व मालिका कमालीच्या यशस्वी झाल्या. लोकांनी या मालिका टेलिव्हिजन आणि मैदानात येऊन भरघोस प्रतिसादात पाहिल्या. मात्र, आशिया चषकाचे आयोजनात सध्या देश आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे क्रीडामंत्र्यांनी सांगितल्यानंतर, स्पर्धेचे आयोजन युएईत करण्याचे निश्चित झाले. आशिया क्रिकेट कौन्सिल बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या काळात आशिया चषक खेळला जाईल. २०१६ नंतर प्रथमच टी२० प्रकारात आशिया चषक खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी लकी! पठ्ठ्याने जेवढे सामने खेळले, तेवढेही सामने संघाने जिंकले
रेणुकाच्या अफलातून गोलंदाजीने विरोधी संघाच्या दांड्या गुल! एकाच व्हिडिओमध्ये पाहा विकेट्सचा थरार
CWG 2022 | भारताचे उत्कृष्ट प्रदर्शन सुरूच, वेटलिफ्टिंगमध्ये गुरदीपने जिंकले दहावे पदक