नुकत्याच श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाने अनेक युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिली होती. या दौऱ्यात अनेक खेळाडूंनी भारतीय संघात पदार्पण केले, तर काही खेळाडू असेही होते ज्यांना खूप दिवसानंतर भारतीय संघात पुन्हा जागा मिळाली होती. काही खेळाडूंनी या दौऱ्याचा चांगलाच फायदा करून घेतला, तर काही खेळाडू आपले कौशल्य दाखविण्यास असमर्थ राहिले. त्यामुळे असे काही खेळाडू आहेत, ज्यांच्यासाठी या दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर संघातील स्थान गमवावे लागू शकते. तर आज आपण त्याच खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
१) हार्दिक पंड्या – गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे हार्दिक पंड्या भारतीय संघातून आत-बाहेर करत आहे. म्हणून श्रीलंका दौरा हार्दिकसाठी महत्त्वाचा होता. हार्दिक हा भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु, या दौर्यात हार्दिकने म्हणावे तसे उत्तम प्रदर्शन केले नाही. त्याने एकदिवसीय मालिकेतील ३ सामन्यात केवळ १९ धावा केल्या आणि टी-२० मालिकेमधील पहिल्या सामन्यात केवळ १० धावा केल्या. तसेच गोलंदाजीतही तो फार काही कमाल दाखवू शकला नाही. अशी कामगिरी पाहता हार्दिकला आगामी काळात भारतीय संघातून डच्चू मिळू शकतो.
२) मनिष पांडे – मनीष पांडे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर होता. पण या श्रीलंका दौर्यात त्याला संधी मिळाली होती. परंतु, मनीष पांडेला या संधीचे सोने करता आले नाही. या दौऱ्यातही त्याची खराब कामगिरी राहिली. एकदिवसीय मालिकेत ३ सामन्यांमध्ये २४.६७ च्या सरासरीने केवळ ७४ धावा बनवू शकला आणि त्याच्या फलंदाजीची गती देखील संथ होती. याच कारणामुळे त्याला टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यातून वगळण्यात आले होते. पांडेच्या अशा कामगिरीमुळे त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.
३) कृणाल पंड्या – भारतीय संघात हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पंड्या देखील एक अष्टपैलू खेळाडू म्हणूनच खेळतो. या मालिकेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी भरपूर संधी होती. परंतु, त्याला या दौऱ्यात काही खास करता आले नाही. २ एकदिवसीय सामन्यात केवळ ३५ धावा केल्या आणि गोलंदाजीतही त्याला खास काही करता आले नाही. केवळ २ बळी त्यानी आपल्या नावे केले. तसेच टी-२० च्या पहिल्या सामन्यात देखील तो केवळ एकच धाव बनवू शकला. यामुळे कृणालला देखील येणाऱ्या काळात भारतीय संघातून डच्चू मिळू शकतो.
महत्वाच्या बातम्या
–कोण करणार इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत रोहितसोबत सलामीला फलंदाजी? ‘हे’ आहेत तीन पर्याय
–नॉटिंघमच्या मैदानावर भारताची बल्ले-बल्ले! आजपर्यंत केली आहे ‘अशी’ जबरदस्त कामगिरी