बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटला प्रथमच स्थान मिळाले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र, इतर दोन आशियाई संघ पाकिस्तान आणि श्रीलंकेची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. दोन्ही संघ साखळी फेरीच्या पुढे जाऊ शकले नाहीत. त्याचवेळी, श्रीलंकेच्या संघाने एक अतिशय लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. श्रीलंकेचा महिला संघ त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या ४६ धावांत गारद झाला.
श्रीलंकेचा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. याशिवाय त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या ४६ धावा करून तीन नकोसे विक्रमही केले. ४६ धावा ही श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाची सर्वात कमी धावसंख्या आहे. त्याचवेळी, याशिवाय, महिला क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर कोणताही संघ केवळ ४६ धावांवर सर्वबाद झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला श्रीलंकेचा संघ १७.१ षटकात अवघ्या ४६ धावा करत सर्वबाद झाला. श्रीलंकेच्या चार बॅटर आपले खाते उघडू शकल्या नाहीत. त्यांची केवळ एक बॅटर दुहेरी धावसंख्या गाठू शकली. ओ रणसिंघेने सर्वाधिक १५ धावांचे योगदान दिले. ४७ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने हा सामना सहज जिंकला. दक्षिण आफ्रिकेने ६.१ षटकात एकही विकेट न गमावता ४९ धावा करत सामना जिंकला. विशेष म्हणजे श्रीलंकेच्या संघाला तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकूनही त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही. या गटातून उपांत्य फेरीसाठी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी आपली जागा सुरक्षित केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टी-ट्वेंटी विश्वचषकातील पराभवाचा बदला इंडिया घेणार, खुद्द पाकिस्तानचा खेळाडूच म्हणतोय…
संपुर्ण यादी: कॉमन वेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी पटकावलेल्या २० मेडल्सची यादी






