श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसून आला नाहीये. आयपीएल २०२० आणि आयपीएल २०२१ च्या हंगामात देखील त्याने खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे तो पुन्हा खेळताना दिसणार की नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांनी उपस्थित केला होता. परंतु तो आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पुर्वी त्याला फिटनेस चाचणीत उत्तीर्ण व्हावे लागेल, अन्यथा त्याचे पुनरागमनाचे स्वप्न अधुरे राहू शकते.
मलिंगाला श्रीलंकन संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याला फिटनेस चाचणीचा टप्पा पार करावा लागणार आहे. नवीन फिटनेस नियमावलीनुसार, खेळाडूंना साढे आठ मिनिटात २ किमी अंतर पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय कुठल्याही खेळाडूला संघात प्रवेश दिला जात नाही. तसेच त्या खेळाडूने देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धामध्ये सहभाग घेतलेला हवा.
मलिंगा तर श्रेष्ठ आहे पण नियम आधी
श्रीलंकेच्या एका वृत्तपत्राशी बोलताना श्रीलंका निवड समितीचे प्रमुख प्रमोद्य विक्रमसिंघे म्हणाले की, “श्रीलंका संघासाठी या नवीन निकषांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि याबद्दल मलिंगालाही सांगण्यात आले आहे.”
तसेच ते मलिंगाबद्दल बोलताना म्हणाले की, “आम्हाला माहित आहे की तो टी-२० चा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्याची सेवा आमच्या संघासाठी नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. परंतु आमच्यासाठी सर्व खेळाडू समान आहेत आणि निवड करतेवेळी सर्वांसाठी समान नियम लागू होतात. मी मलिंगाला असेही सांगितले की, राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडूंनी सक्रिय असणे आवश्यक आहे. जर मलिंगाने हे निकष पाळले तर आम्ही निवड करताना त्यांचा विचार नक्की करू.” याबाबत मलिंगाने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाहीये.
मलिंगाने कसोटी आणि वनडे क्रिकेटला याआधीच रामराम केले आहे. तसेच त्याने शेवटचा टी-२० सामना मार्च २०२० मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याने एकही सामना खेळला नाहीये. इतकेच नव्हे तर तो आयपीएलच्या दोन हंगामात देखील उपलब्ध नव्हता. मलिंगाच्या नेतृत्वात श्रीलंका संघाने २०१४ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
५ असे क्रिकेटपटू ज्यांचे संघातच होते मोठे दुश्मन, दोन जोड्या आहेत भारतीय
नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया करणार ‘या’ देशाचा दौरा, पाहा कसे असेल वेळापत्रक!