पाकिस्तान महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (४ जुलै) पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. तसेच,वेस्ट इंडिज संघाची कर्णधार स्टेफनी टेलरने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
एकाच सामन्यात केली दुहेरी कामगिरी
वेस्ट इंडिज महिला संघाची कर्णधार स्टेफनी टेलर हिने या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिने पहिल्या डावात गोलंदाजी करताना हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना तिने ४१ चेंडुंमध्ये ४३ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
स्टेफनी टेलर ही टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅटट्रिक घेणारी १९ वी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तसेच वेस्ट इंडिज संघाची ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी वेस्ट इंडिज संघासाठी असा कारनामा २०१८ मध्ये अनिसा मोहम्मद हिने दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध केला होता.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम हॅटट्रिक घेण्याचा विक्रम पाकिस्तान संघाची महिला गोलंदाज अस्माविया इकबाल खोकरी हिच्या नावावर आहे. तसेच २०१२ मध्ये अस्मावियाने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हॅटट्रिक घेत इतिहासाला गवसणी घातली होती. (Stafanie Taylor becomes just the second west indies women to take a t20 hattrick)
वेस्ट इंडिज संघाने मिळवला ६ गडी राखून विजय
या सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकात १०२ धावा केल्या होत्या. यामध्ये आलिया रियाजने सर्वाधिक २९ धावांचे योगदान दिले होते, तर मुनिबा अलीने १८ धावांची केली होती. वेस्ट इंडिज संघाकडून गोलंदाजी करताना स्टेफनी टेलरने सर्वाधिक ४ गडी बाद केले होते.
पाकिस्तान महिला संघाने दिलेल्या १०३ धावांचा पाठलाग करताना कर्णधार स्टेफनी टेलरने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली होती. तर केसिया नाईटने नाबाद २४ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने ६ गडी राखून सामना आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या-
‘अशी’ ३ कारणे ज्यामुळे पृथ्वी शॉला इंग्लंड दौऱ्यावर पाठवणे ठरेल अयोग्य
बीसीसीआयसाठी यंदाची दिवाळी असेल बंपर दिवाळी! आयपीएलच्या नव्या संघांची नावे येणार पुढे