मुंबई | इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क ‘स्टार इंडिया’ कंपनीला मिळाले आहे. अनेक मोठ्या कंपन्या यासाठी लिलावात असताना ‘स्टार इंडिया’ने तब्बल १६ हजार ३४७ कोटी रुपयांची बोली लावत प्रक्षेपणाचे हक्क मिळवले आहे. हे हक्क २०१८ ते २०२२ या पाच वर्षासाठी असून प्रत्येक वर्षाला बीसीसीआयला ३ हजार २६९ कोटी मिळणार आहे.
त्याबरॊबर बीसीसीआयने यावर्षी वेगवेगळ्या गोष्टींचे हक्क विकून मोठी रक्कम उभी केली आहे. त्या सर्व गोष्टींचा महा स्पोर्ट्सने घेतलेला आढावा…
१- पुढील पाच वर्षांसाठी स्टार इंडिया भारतीय क्रिकेट बोर्डाला तब्बल १६,३४७.५० कोटी रुपये मोजणार आहे. सोनी यासाठी गेले १० वर्ष ८२०० रुपये मोजत होते.
२- २०१३-२०१७ या कालावधीत हक्कांच्या रकमेपेक्षा ही रक्कम तब्बल चौपट आहे.
३- सध्या स्टार स्पोर्ट्सकडे इंग्लंडचा भारतातील दौरा, ऑस्ट्रेलिया भारतातील दौरा, आयसीसीच्या स्पर्धा आणि आयपीएलचे प्रसारणाचे हक्क आहेत.
४- सध्या भारतीय संघाचा एक सामना प्रसारण करण्याचे ४३ कोटी तर आयपीएल प्रसारणाचे तब्बल ५४.४९ कोटी भारतीय क्रिकेट बोर्डाला मिळणार आहे.
५- लिलावावेळी ज्या ज्या कंपन्यांनी भाग घेतला होता त्यांची एकत्रित रक्कम ही १५,९८१.५१ कोटी होती तर एकट्या स्टार इंडियाने लावलेली बोली १६३४७.५ कोटी होती.
६- स्टार इंडिया एका आयपीएल मोसमासाठी तब्बल ३२६९.५० कोटी रुपये मोजणार आहे. याचा अर्थ प्रत्येक सामन्यासाठी ते ५४.४९ कोटी रुपये देणार आहेत.
७- आयपीएलचे टायटल स्पॉन्सर्स असणाऱ्या विवो कंपनीने भारतीय क्रिकेट बोर्डाला १ ऑगस्ट २०१७ ते ३१ जुलै २०२२ या काळासाठी २१९९ कोटी रुपये देणार आहे. २०१६-२०१७ या वर्षात विवो प्रत्येक वर्षासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाला १०० कोटी रुपये देत होते.
८- भारतीय क्रिकेट संघाला ओप्पो या चायनीज कंपनीने स्पॉन्सर्सशिप दिली असून यासाठी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी तब्बल १०७९ कोटी रुपये मोजले आहे. या काळात भारतीय संघ १४ मालिका घराच्या मैदानावर तर २० मालिका परदेशात खेळणार आहे. यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, आयसीसी विश्वचषक आणि टी२० विश्वचषक यांचा समावेश आहे. याबदल्यात त्यांना आपला लोगो पुरुष, महिला, अंडर १९ आणि भारतीय अ संघाच्या किटवर लावता येणार आहे.
९- जगप्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुकने यासाठी ३९०० कोटी रुपयांची बोली लावली होती तर सोनी कंपनीने ११०५० कोटी रुपये यासाठी मोजायला तयारी दर्शवली होती. फेसबुकची बोली ही भारतीय उपखंडातील डिजिटल हक्कांसाठी होती.
१०- सोनी कंपनीने ११०५० कोटी रुपयांची बोली ही भारतीय उपखंडातील टीव्ही हक्कांसाठी होती.
११- इंग्लंड क्रिकेट बोर्डाला एका वर्षाच्या प्रसारणासाठी २८७ मिलियन अमेरिकन डॉलर, ऑस्टेलियाला १०० मिलियन अमेरिकन डॉलर, भारतीय क्रिकेट बोर्डाला १२५ मिलियन अमेरिकन डॉलर, बीबीएल स्पर्धेला २० मिलियन अमेरिकन डॉलर तर आयपीएलला ५०८ मिलियन अमेरिकन डॉलर मिळतात.
१२- २४ कंपन्यांनी ह्या लिलावासाठी नोंदणी केली होती परंतु प्रत्यक्ष १४ कंपन्यांनी यात भाग घेतला. यात भारतातील टीव्ही प्रसारणाचे हक्क, भारतातील डिजिटल हक्क, अमेरिका, यूरोप, मिडल ईस्ट, आफ्रिका आणि बाकी राहिलेले जग अशा वेगवेगळ्या प्रकारात ही बोली लावली गेली.