राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री म्हाळसाकांत ज्युनिअर कॉलेज आकुर्डीच्या संघ उपविजयी झाला. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडचा संघ पुणे विभागातून अनेक वर्षांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेला होता.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी अभिजित सावंत, ऋषिकेश पडुल यांची महाराष्ट्र संघात निवड झाली असून पवन मिसाळ व ऋषिकेश राऊत यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी राखीव म्हणून निवड झाली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी सांगली द्वारा शालेय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन उरण इस्लामपूर सांगली येथे करण्यात आले होते.
पुणे विभागाचे म्हाळसाकांत कॉलेज संघाने अंतिम सामन्यापर्यंत लातूर व कोल्हापूर संघाबरोबर एकतर्फी विजय मिळवला. अंतीम सामना औरंगाबाद संघाशी खेळताना २५-१९, १९-२५, २३-२५, २८-२६, १६-१४ गुणांचे अतितटीचे सेट झाले. संघास उपविजयी पदावर समाधान मानावे लागले.
म्हाळसाकांत संघात स्मँशर व ब्लॉकर अभिषेक सावंत, स्मँशर ऋषीकेश पडुल, ऋषीकेश राऊत, लिब्रो पवन मिसाळ, सेंटर ऋषीकेश सिद्धगवळी, अविनाश बाजाड, अजय हर्बडे, तेजस ताम्हाणे यांनी उत्कृष्ठ खेळ केला. खेळाडूंना संस्थेचा माजी विद्यार्थी व पिंपरी चिंचवड महापालिका अभियंता दशरथ वाघोले यांनी प्रशिक्षण दिले.
क्रीडा शिक्षक प्रा अनिल दाहोत्रे, शरद सस्ते यांनी मार्गदर्शन केले राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूची निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिकचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ऍड संदीप कदम, खजिनदार एड मोहनराव देशमुख, उपसचिव एल एम पवार, सहसचिव(प्रशासन) आत्माराम जाधव, सहा. सहसचिव डॉ एम.जी चासकर, संस्थाअधीक्षक सीताराम अभंग, क्रीडाप्रमुख शाम भोसले, प्राचार्य अन्सार शेख, उपप्राचार्य बाबासाहेब शितोळे यांनी खेळाडूचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.