पुणे | पुण्याच्या मनोज म्हाळस्कर, विकास डमरे, विजय जगताप यांनी राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत आपापल्या गटातून सुवर्णपदकाची कमाई केली.पु. ना. गाडगीळ यांच्या सौजन्याने आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने सोमणस् हेल्थ क्लब व पुणे जिल्हा अॅमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डी. पी. रस्त्यावरील गोल्डन लीफ लॉन्स येथे ही स्पर्धा सुरू आहे.
या स्पर्धेतून लखनौ येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन पु. ना गाडगीळचे सौरभ गाडगीळ यांच्या हस्ते झाले. या वेळी इन्कम टॅक्स विभागाच्या अतिरिक्त आयुक्त एकता बिश्नोई, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर भोईर, सचिव संजय सरदेसाई, पुणे जिल्हा अॅमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष राजहंस मेहेंदळे, सचिव अॅड. रवींद्र यादव,संतोष खांडगे उपस्थित होते.
या स्पर्धेतील वरिष्ठांच्या ६६ किलो गटात पुण्याच्या मनोज म्हाळस्करने एकूण ४९२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. त्याने स्क्वॅटमध्ये १८२.५ किलो, बेंच प्रेसमध्ये १०० किलो आणि डेड लिफ्टमध्ये २१० किलो वजन उचलले.
मुंबई शहरच्या तुषार गोसावीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने एकूण ४७५ किलो वजन उचलले. ठाण्याच्या मंगेश परबने ब्राँझपदक मिळवले. त्याने एकूण ४४२.५ किलो वजन उचलले.
यानंतर ७४ किलो गटात पुण्याच्या विकास डमरेने एकूण ५७० किलो वजन उचलून सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने स्क्वॅटमध्ये १९५ किलो, बेंच प्रेसमध्ये १४० किलो आणि डेड लिफ्टमध्ये २३५ किलो वजन उचलले.
ठाण्याच्या विवेकसिंगने एकूण ४९५ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले, तर मुंबई उपनगरच्या अभिजित वैष्णवने एकूण ४७२.५ किलो वजन उचलून ब्राँझपदक पटकावले. स्पर्धेतील ५९ किलो गटात मुंबईच्या प्रशांत पडवीने एकूण ३२२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले.
स्पर्धेतील ज्युनियर मुलांच्या ५३ किलो गटात मुंबई उपनगरच्या विराज पवारने पुण्याच्या प्रज्वल शेलारला मागे टाकले. विराजने एकूण ३१७.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले.
त्याने स्क्वॅटमध्ये ११२.५ किलो, बेंच प्रेसमध्ये ६० किलो आणि डेड लिफ्टमध्ये १४५ किलो वजन उचलले. प्रज्वलला (एकूण २९७.५ किलो) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुंबई उपनगरच्या रवींद्रने (२९२.५ किलो) ब्राँझपदक मिळवले.
५९ किलो गटात पुण्याच्या विजय जगतापने एकूण ४१७.५ किलो वजन उचलून सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने स्क्वॅटमध्ये १४७.५ किलो, बेंच प्रेसमध्ये ९२.५ किलो आणि डेड लिफ्टमध्ये १७७.५ किलो वजन उचलले.
मयुर उमरुटकरने (३९५ किलो) रौप्य, तर शार्दूल भुवडने (२५५ किलो) ब्राँझपदक पटकावले. ६६ किलो गटात मुंबई शहरच्या तुषार गोसावीने सुवर्ण, मुंबई उपनगरच्या बिमल थापाने रौप्य, तर पुण्याच्या किरण थिटेने ब्राँझपदक मिळवले.
तुषारने एकूण ४७५ किलो, बिमलने ४४५ किलो आणि किरणने ४३५ किलो वजन उचलले. यानंतर ७४ किलो गटात मुंबईच्या अक्षय नवलेने स्क्वॅटमध्ये १७५ किलो, बेंच प्रेसमध्ये १०२.५ किलो, डेड लिफ्टमध्ये १९५ किलो, असे एकूण ४७२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. सुदेश गावडेने (४६७.५ किलो) रौप्य, तर संदीप गुरवने (४६७.५ किलो) ब्राँझपदक मिळवले.