शांघाय । आज जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या स्पेनच्या राफेल नदाल आणि द्वितीय स्थानी असणाऱ्या रॉजर फेडरर यांच्यात शांघाय ओपनची अंतिम फेरी होणार आहे. हे दोन खेळाडू गेल्या ११ वर्षात ३८व्यांदा समोरासमोर आले आहेत. या दोन खेळाडूंच्या द्वंद्वातील ही खास आकडेवारी
– नदाल उपांत्यफेरीचा सामना जिंकून सलग १६ सामने अपराजित आहे.
-नदालने जर ही स्पर्धा जिंकली तर एटीपी मास्टर्सचे त्याचे हे ३१वे विजेतेपद ठरेल. सर्वाधिक एटीपी मास्टर्स विजेतेपद नोवाक जोकोविच आणि नदालच्या नावावर आहेत. दोघेही खेळाडू ३० एटीपी मास्टर्स जिंकले आहेत.
-नदालने या स्पर्धेत विजय मिळवला तर तो वर्षअखेरीस जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर राहायचा पराक्रम ४थ्यांदा करेल.
-जर आज रॉजर फेडरर जिंकला तर एटीपी मास्टर्स स्पर्धेतील त्याचा हा ३५०वा विजय असेल.
-या वर्षी फेडरर आणि नदाल ४थ्यांदा समोरासमोर येत असून ऑस्ट्रेलियन ओपन, मियामी ओपन आणि बीएनपी पारिबास ओपनमध्ये फेडररने नदालला पराभूत केले आहे.
-जर फेडरर ही स्पर्धा जिंकला तर त्याचे हे एटीपी मास्टर्सचे २७वे विजेतेपद असेल. या यादीत अव्वल स्थानी नदाल (३०) आणि जोकोविच (३०) आहेत.
-फेडरर नदाल आजपर्यंत ३७वेळा समोरासमोर आले असून त्यात नदालने २३ तर फेडररने १४ सामने जिंकले आहेत. हार्ड कोर्टवरील १९ पैकी १० लढती फेडररने तर नदालने ९ लढती जिंकल्या आहेत.
-रॉजर फेडररचा हा १४३ वा अंतिम फेरीचा सामना आहे. त्यात त्याने ९३ विजेतेपद मिळवली आहेत तर ४९वेळा तो उपविजेता ठरला आहे.
-शांघाय ओपनमधील फेडररची ही तिसरी अंतिम फेरी असून आजपर्यंत तो एकवेळ विजेता आणि एकवेळ उपविजेता राहिला आहे.
-या मोसमात फेडररने ५विजेतेपदं मिळवली आहेत तर १ उपविजेपदही त्याच्या नावावर आहे.
-आजपर्यंत जोकोविच- नदाल हे ५०व्यांदा आमने-सामने आले आहे तर फेडरर-जोकोविच ४५वेळा आणि फेडरर-नदाल ३८वेळा आमने-सामने आले आहेत. कोणत्याही दोन खेळाडूंमधील हे विश्वविक्रम आहे.
-जर फेडररने आज ही स्पर्धा जिंकली तर हे त्याचे ९४वे विजेतेपद असेल. याबरोबर ओपन इरामध्ये सर्वाधिक विजेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो इवान लेंडल यांच्याबरोबर दुसऱ्या स्थानावर येईल. पहिल्या स्थानावर जिमी कोंनॉर्स आहेत. त्यांनी १०९ विजेतेपद जिंकली आहेत.
-रॉजर फेडरर या मोसमात क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये असलेल्या खेळाडूंकडून १० पैकी केवळ एकदा पराभूत झाला आहे. त्याला रॉजर्स कप स्पर्धेत अलेक्झांडर झवेरवने पराभूत केले होते.
-२३ फायनल्समध्ये नदालने फेडररला १४वेळा पराभूत केले आहे तर फेडररने नदालला ९वेळा पराभूत केले आहे.
-एटीपी मास्टर्स स्पर्धांच्या अंतिम फेरीत नदाल फेडरर ११वेळा समोरासमोर आले आहेत ज्यात नदालने ७ तर फेडररने ४ विजतेपद मिळवली आहेत.
-नदालची ही शांघाय ओपनची दुसरी अंतिम फेरी आहे.
-नदाल यावर्षी ९ पैकी ६ अंतिम फेरीच्या लढती जिंकला आहे.
-एका मोसमात १० अंतिम फेरी खेळायचा पराक्रम नदाल ५व्यांदा करत आहे.