बेंगलोर। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतात कोणत्याही खेळाच्या स्पर्धा होऊ शकल्या नाही. त्यामुळे खेळाडू बरेच दिवस मैदानापासून दूरच राहिले. भारतीय राष्ट्रीय हॉकी संघासाठी 100 पेक्षा अधिक सामने खेळणारी मिडफिल्डर निक्की प्रधानला असा विश्वास आहे की मिळालेल्या ब्रेकमुळे खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
योग्यवेळी मिळाला ब्रेक
मिळालेल्या ब्रेकबद्दल बोलताना निक्की म्हणाली की, “भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये पुन्हा एकदा स्पर्धा सुरू केली आहे. मिळालेल्या ब्रेकमुळे मला माझ्या कारकिर्दीला कसे पुढे न्यायचे आहे याचा विचार करण्यास वेळ मिळाला. हा ब्रेक योग्यवेळी मिळाला.”
चुका सुधारण्यावर विचार करण्याची मिळाली संधी
“कधीकधी आपण जेव्हा वरच्यावर स्पर्धा खेळत असतो, तेव्हा खेळाच्या काही बाबींचा विचार करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. मला वाटले की हा ब्रेक माझ्यासाठी योग्य वेळी आला आहे. कारण मी नुकताच 100 वा सामना खेळला. मी खेळपट्टीपासून दूर असताना माझ्या पहिल्या 100 सामन्यांच्या तयारीत मी कोणत्या प्रकारच्या चुका केल्या आणि त्या पुढे जाऊन कसे सुधारू शकेन याबद्दल विचार करण्याची संधी मला मिळाली,” असेही पुढे बोलताना निक्की म्हणाली.
माझ्या खेळाबद्दल आनंदी आहे
पुनरागमनाबद्दल बोलताना निक्की म्हणाली की, “ऑगस्टनंतर मैदानात पुनरागमन करून खूप चांगले वाटले. आम्हाला खेळाबद्दल किती प्रेम आहे आणि नियमितपणे भारतासाठी खेळणे किती मोठा सन्मान आहे, हे आम्हा सर्वांनाच समजले आहे. ऑलिम्पिकसाठी सराव सुरू करण्यापूर्वी सर्व प्रक्रियेची खात्री करुन घेतल्याबद्दल आम्ही हॉकी इंडिया आणि एसएआयचे खूप आभारी आहोत. मी आतापर्यंत केलेल्या खेळाबद्दल आनंदी आहे.”