चेन्नई। आज(1 मे) आयपीएल 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात 50 वा सामना रंगणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा नियमित कर्णधार एमएस धोनीच्या खेळण्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे.
त्याच्या फिटनेसबद्दल चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्याआधी पूर्वसंध्येला माहिती दिली आहे.
ते म्हणाले, ‘धोनी ठिक होत आहे. तो मागील आठवड्यात आजारी होता. त्याच्याबद्दल आम्ही उद्या(1 मे) निर्णय घेऊ. तो ठिक होत आहे, ही चांगली गोष्ट आहे.’
धोनीने सोमवारी आणि मंगळवारी सराव सत्रात भाग घेतलेला नाही. त्यामुळे आता धोनी दिल्ली विरुद्ध खेळणार की नाही हे सामन्याआधी सर्वांना कळेल.
धोनी 26 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्याला मुकला होता. त्यावेळी त्याला ताप असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच फाफ डु प्लेसिस आणि रविंद्र जडेजा देखील या सामन्याला मुकले होते. जडेजाही या सामन्याआधी आजारी होता.
पण हे दोघेही आता ठिक असल्याचेही फ्लेमिंग यांनी सांगताना दिल्ली विरुद्धच्या सामन्यासाठी हे दोघेही निश्चितपणे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. फ्लेमिंग म्हणाले, ‘फाफ ठिक आहे. जडेजाही सराव करत आहे. त्या दोघांचा दिल्ली विरुद्धच्या सामन्यासाठी निश्चितपणे विचार केला जाईल.’
त्याचबरोबर जर धोनीला या सामन्यासाठीही मुकावे लागले तर त्याच्या अनुपस्थितीची भरपाई कशी केली जाईल, असे विचारल्यावर फ्लेमिंग म्हणाले, ‘आम्हाला ते करावे लागेल. जरी हा एक सामना असला, तरी त्याचा परिणाम होऊ शकतो. जर असे सलग दोन ते तीन सामने असतील तर त्यासाठी तूम्ही वेगळी तयारी करता.’
‘मागील सामन्यात धोनी बाहेर पडला, तसेच आमचे काही मोठे खेळाडूही लयीत खेळले नाही. त्यामुळे त्यांच्यावर काम करावे लागेल, पुढील शेवटच्या चार सामन्यांसाठी आम्हाला त्यांच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल.’
धोनी या आयपीएल मोसमात आत्तापर्यंत दोन सामन्यांना मुकला आहे. या दोन्ही सामन्यात चेन्नईला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे जर धोनी आज खेळला नाही, तर त्याच्या अनुपस्थितीत चेन्नईचा संघ कसा प्रदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.
तसेच दिल्ली कॅपिटल्सच्या संघाबद्दल फ्लेमिंग म्हणाले, ‘त्यांनी युवा खेळाडूंसह चांगली सुरुवात केली आहे. कागिसो रबाडा मस्त खेळत आहे. तसेच त्यांची मधली फळी स्थिरावलेली आहे.’
दिल्ली आणि चेन्नई हे दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत 12 सामन्यांपैकी 8 सामन्यातील विजयांसह अनुक्रमे पहिल्या दोन स्थानांवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–ऑस्ट्रेलियाचा तो क्रिकेटपटू रोहित शर्माशी बोलला चक्क मराठीत, पहा व्हिडिओ
–किंग्स इलेव्हन पंजाबसमोरील अडचणीत वाढ, निलंबणाची शक्यता
–मराठमोळ्या केदारने केले आपल्या चाहत्याला खुष!!!