भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (17 फेब्रुवारी) दिल्ली येथे खेळला जाईल. अरुण जेटली स्टेडियम येथे होणाऱ्या या सामन्यातून मालिकेत पुनरागमन करण्याचा ऑस्ट्रेलिया संघाचा प्रयत्न असेल. नागपूर येथील पहिल्या कसोटीत पराभूत व्हावे लागल्यानंतर, ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीचे प्रमुख आधारस्तंभ असलेल्या स्टीव्ह स्मिथ व मार्नस लॅब्युशेन यांनी एका विशिष्ट पद्धतीने सराव केला. त्या सरावाची छायाचित्रे आता व्हायरल होत आहेत.
नागपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूं पुढे अक्षरशः नांग्या टाकल्या. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 तर दुसरा डाव अवघ्या 91 धावांवर गुंडाळला. त्यामुळे दिल्ली कसोटीतही भारतीय फिरकीपटूंचे मोठे आव्हान ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर असेल.
Here are @stevesmith49 and @marnus3cricket taking batting in pairs to the next level. They’re facing the bowler together, at the same time #IndvAus pic.twitter.com/TMsBdLKdZJ
— Bharat Sundaresan (@beastieboy07) February 15, 2023
हीच शक्यता पाहून सध्या जागतिक कसोटी फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या मार्नस लॅब्युशेन व अनुभवी स्टीव्ह स्मिथ यांनी एकत्रित सराव केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या छायाचित्रांमध्ये लॅब्युशेन यष्ट्यांच्यासमोर तर स्मिथ यष्ट्यांच्या पाठीमागे सराव करताना दिसतोय. यामुळे चेंडू किती वळतो याचा सराव होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पहिल्या सामन्यात लॅब्युशेन व स्मिथ हेच ऑस्ट्रेलियाचे सर्वात अनुभवी फलंदाज ठरले होते. लॅब्युशेनने पहिल्या डावात सर्वाधिक 49 धावांची खेळी केली होती. तर, स्मिथने पहिल्या डावात 37 व दुसऱ्या डावात नाबाद खेळी केली होती.
दिल्ली कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ-
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नॅथन लायन व जोस हेजलवूड.
(Steve Smith And Marnus Labuschagne Special Practice Before Delhi Test)