मुंबई । चाणाक्ष कर्णधार एमएस धोनीच्या तालमीत वाढलेला आणि संघाला हुकमी एक्का म्हणून ओळखला जाणारा रवींद्र जाडेजाचे क्षेत्ररक्षक म्हणून असलेलं महत्त्व विसरता येत नाही. त्याने कर्णधाराचा विश्वास फलंदाज, गोलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक अशा भूमिका इमाने इतबारे निभवताना सार्थ ठरवला आहे. त्याची ही तिहेरी कामगिरी प्रतिस्पर्ध्यांची चहूबाजूने कोंडी करण्यासारखे असते. अष्टपैलूंची देणगी लाभलेल्या जडेजा आपल्या चपळ आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने साऱ्यांनाच प्रभावित केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ याने अष्टपैलू रवींद्र जाडेजाला सध्याचा जगातला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक असून मी त्याचा आदर करत असल्याचे सांगितले. यासोबत स्मिथने युवा खेळाडूंमध्ये भारताचा स्टार फलंदाज लोकेश राहुल याला सर्वात प्रतिभाशाली क्रिकेटपटू असल्याचे सांगितले. स्मिथने रविवारी इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नात उत्तर देताना ही माहिती दिली.
इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांनी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सर्वाधिक प्रतिभाशाली भारतीय खेळाडू कोण?असा प्रश्न विचारल्यावर स्टीव्ह स्मिथने रवींद्र जाडेजा आणि लोकेश राहुल यांचे नाव सांगितले.
स्टीव्ह स्मिथ खेळ राहुलच्या फलंदाजीपासून खूपच प्रभावित झाला आहे. राहुलने भारताकडून 36 कसोटी, 32 वन-डे आणि 42 टी-20 अंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. वन-डे क्रिकेटमध्ये तो भारतीय संघातला नियमित सदस्य आहे. नजाकतीने खेळून भरपूर धावा काढणारा राहुल सध्या भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून आपली भूमिका पार पाडत आहे.
एमएस धोनी विषयी स्मिथ म्हणाला की,” धोनी लेजंड. मिस्टर कूल।’ तसेच इंडियन प्रीमियर लीग सर्वोत्तम लीग असून त्यामध्ये मला खेळायला आवडते.” भारताचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड याच्या विषयी विचारले असता तो म्हणाला, “द्रविड खूपच चांगला माणूस आणि एक खेळाडू आहे. याच वर्षी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. ही मालिका खूपच रोमांचक होणार असून आतुरतेने वाट पाहत असल्याचे स्मिथने सांगितले.”
डाव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करणारा 31 वर्षीय रवींद्र जाडेजाने भारताकडून 49 कसोटी सामन्यात 35.3 च्या सरासरीने 1869 धावा केल्या आहेत. तर क्षेत्ररक्षण करताना 36 झेल आणि 6 वेळा धावबाद केले. 165 वनडे सामने खेळून 31.9च्या सरासरीने 2296 धावा केल्या. तर क्षेत्ररक्षण करताना 58 झेल आणि 21 वेळा धावबाद केले. टी-20 मध्ये 49 सामने खेळून 12.3 च्या सरासरीने 173 धावा केल्या आहेत. याचसोबत 21 झेल आणि 7 वेळा धावबाद केले आहे. गोलंदाजीत आपल्या फिरकीची कमाल दाखवत कसोटीत 213, 187 वनडेत आणि टी-20 मध्ये 39 बळी टिपले.