रविवारी (१७ ऑक्टोबर) आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सोमवारी (१८ ऑक्टोबर) या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सराव सामन्याची लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारत ३ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात स्टीव्ह स्मिथने अविश्वसनीय झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. स्टीव्ह स्मिथने टिपलेला हा झेल पाहून फलंदाजच नव्हे तर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षक देखील आश्चर्यचकित झाले होते. सुरुवातीला वाटले होते की, हा झेल सुटणार परंतु शेवटच्या क्षणी स्टीव्ह स्मिथने असे काही केले जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
तर झाले असे की, न्यूझीलंड संघाची फलंदाजी सुरू असताना १८ वे षटक टाकण्यासाठी केन रिचर्डसन गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचवा चेंडू केन रिचर्डसनने आखूड टप्प्याचा टाकला. ज्यावर मिचेल सॅंटनरने मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तो फटका पाहून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल असे वाटू लागले होते. इतक्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या स्टीव्ह स्मिथने भन्नाट झेल टिपला आणि तोल मागे जाऊन षटकार जाऊ नये म्हणून त्याने शेवटच्या क्षणी चेंडू मैदानाच्या आत फेकला.त्यावेळी एस्टन एगरने तो झेल टिपला आणि फलंदाज बाद होऊ माघारी परतला.
https://www.instagram.com/reel/CVMNE2sBnIX/?utm_source=ig_web_copy_link
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना केन विलियम्सनने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. तर डेरील मिशेलने ३३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटकाअखेर ७ बाद १५८ धावा करण्यात यश आले. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. तर मार्कस स्टोइनिसने २८ धावांचे योगदान दिले.या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने सराव सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला.