जयपूर। शनिवारी(27 एप्रिल) सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात आयपीएल 2019 चा 45 वा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानने 7 विकेट्सने विजय मिळवला असून स्पर्धेतील आव्हानही कायम ठेवले आहे.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने हैद्राबादचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा अफलातून झेल घेतला आहे. याचा व्हिडिओ आयपीएलने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हैद्राबादकडून वॉर्नरने 37 धावांवर असताना 13 व्या षटकात ओशान थॉमसने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची वरची कड लागून उंच उडाला. त्यावेळी मिड-ऑफला क्षेत्ररक्षण करत असलेल्या स्मिथने त्याच्या उजवीकडे पळत जाऊन उडी मारत अफलातून झेल घेतला.
स्मिथच्या या झेलमुळे वॉर्नर आणि मनिष पांडेमध्ये दुसऱ्या विकेटसाठी झालेली 75 धावांची भागीदारीही संपुष्टात आली. त्याचबरोबर वॉर्नरची सलग सहा अर्धशतकांची मालिकाही संपुष्टात आली.
या सामन्यात वॉर्नर बाद झाल्यानंतर काहीवेळात 61 धावांची अर्धशतकी खेळी करणारा मनिष पांडेही बाद झाला. पण त्याच्या या अर्धशतकाच्या जोरावर हैद्राबादने 20 षटकात 8 बाद 160 धावा केल्या.
त्यानंतर 161 धावांचे आव्हान राजस्थानने 19.1 षटकात सहज पार केले. राजस्थानकडून लियाम लिव्हिंगस्टोनने 26 चेंडूत 44 आणि संजू सॅमसनने 32 चेंडूत नाबाद 48 धावा करत या विजयात मोलाचा वाटा उचलला.
त्याचबरोबर गोलंदाजीत राजस्थानकडून जयदेव उनाडकटने 26 धावांत 2 विकेट्स घेऊन महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याच्याबरोबरच वरुण ऍरॉन, श्रेयस गोपाल आणि ओशान थॉमस यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. हैद्राबादकडून शाकिब अल हसन, राशीद खान आणि खलील अहमदने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
https://twitter.com/IPL/status/1122172785084624896
महत्त्वाच्या बातम्या –
–Video: त्या फलंदाजाने एक धाव घेताच संघसहकाऱ्यांनी वाजवल्या टाळ्या, जाणून घ्या कारण
–जिंकली राजस्थान रॉयल्स पण फायदा झाला चेन्नई सुपर किंग्सला
–हार्दिक पंड्याने हिटमॅनला दिला अॅव्हेंजर्समध्ये सामील होण्याचा सल्ला






