२० नोव्हेंबर २००३, दुपारी अडीचच्या सुमारास एनडीटीव्ही वाहिनीवर एक बातमी आली. भारतीय क्रिकेट बोर्डाचे सहसचिव रत्नाकर शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, एका भारतीय क्रिकेटपटूने संघ निवडकर्त्यांना पैसे देऊन संघात स्थान मिळविण्याचा प्रयत्न केला होता. रत्नाकर शेट्टी यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला ही गोष्ट सांगितली होता. याचा संदर्भ देत, एनडीटीव्हीने ही खळबळजनक बातमी सादर केली. रत्नाकर शेट्टी म्हणाले की, खेळाडूला कठोर शिक्षा होईल. संध्याकाळपर्यंत, त्या खेळाडूचे नाव सार्वजनिक झाले. तो खेळाडू होता महाराष्ट्राचा अभिजीत काळे. अभिजीतने काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.
अभिजीत काळे मुंबईत आपले क्रिकेट खेळत असताना, मुंबईचा रणजी संघातील जागांसाठी असलेल्या कडव्या स्पर्धेमुळे त्याने महाराष्ट्र रणजी संघाकडून खेळण्यास प्राधान्य दिले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करूनही अभिजीतला राष्ट्रीय संघात स्थान मिळत नव्हते. काळेने ८४ प्रथमश्रेणी सामन्यांत ६,८०६ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून २४ शतके आणि २७ अर्धशतके आली होती. त्याने त्याच्या अर्ध्याहून अधिक सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. यावेळी काळेची सरासरी ५८.६७ होती. त्या वेळी भारतीय संघात नियमितपणे खेळणाऱ्या युवराज सिंग ( ४१.८०) व दिनेश मोंगिया(४४.३०) यांच्यापेक्षा ही सरासरी कितीतरी अधिक होती. टीम इंडियाच्या बड्या खेळाडूंनी विश्रांती घेण्याचा विचार केला तेव्हा काळेला बांगलादेश दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाले.
१९८८ मध्ये सचिन तेंडुलकरसोबत त्या वर्षीचा, मुंबई क्रिकेट असोसिएशनचा, सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू असलेल्या काळेने सलामीवीर फलंदाज म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. १९९२ मध्ये भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघात खेळत असताना, न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध शतक झळकावून तो प्रकाश झोतात आला. मुंबई संघामधून बाहेर पडल्यानंतर त्याने महाराष्ट्र संघाचा मध्यक्रम सांभाळला. २००१ मध्ये जेव्हा इंग्लंडचा संघ भारत दौर्यावर आला होता, त्यावेळी अभिजित काळेने भारतीय अ संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. यानंतर, २००३ मध्ये जेव्हा भारत अ संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला तेव्हा अभिजीतने आपला करिष्मा पुन्हा दाखविला. शेवटी, अभिजीतने बांगलादेशला उड्डाण केले. एप्रिल २००३ मध्ये तो एक वनडे खेळला. ज्यामध्ये त्याने अवघ्या १० धावा बनविल्या.
नोव्हेंबर २००३ मध्ये, निवड समितीचे सदस्य किरण मोरे व प्रणव रॉय यांनी, ‘अभिजीतने आम्हाला संघात निवड करण्यासाठी प्रत्येकी दहा लाख लाच देण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप केला.
परंतु, या संपूर्ण प्रकरणात ऊन सावलीसारखा खेळ सुरू होता. आज एक तर उद्या एक अश्या नवनवीन गोष्टी बाहेर येत होत्या. सुरुवातीला या दोन्ही निवडकर्त्यांनी अभिजितने पैशाची ऑफर भारत अ संघात समावेश करण्यासाठी दिली असल्याचे सांगितले होते. नंतर पैशांची ऑफर राष्ट्रीय संघात स्थानासाठी असल्याचे सांगण्यात आले. ( त्या काळात भारत अ साठी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वार्षिक ४ लाख रुपये मिळत ) या बरोबरच आणखी एक गोष्ट पुढे आली. नंतर मोरे व रॉय यांनी आपला पक्ष बदलला. त्यांनी पूर्वी असे सांगितले जात होते की, काळे यांनी स्वतः पैशांची ऑफर केली होती, नंतर ही ऑफर काळे यांच्या आईने दिल्याचे सांगण्यात आले. या विषयावर महाराष्ट्राचे मुख्य निवडकर्ते यजुर्वेंद्र सिंह यांनी विस्डेन क्रिकइन्फोला सांगितले की, “या बातमीने मला मोठा धक्का बसला आहे.” मला असं वाटत नाही की काळेमध्ये इतकी मोठी रक्कम देण्याची क्षमता आहे. ”
पण यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरवे म्हणाले की, कोणत्याही डागळलेली प्रतिमा असलेल्या खेळाडूला संघात सहभागी करून घेण्याची माझी इच्छा नाही. ”
अशाप्रकारे अभिजीतला ४ दिवसानंतर सुरू होणाऱ्या रणजी मोसमातून त्याला संघातून वगळण्यात आले.
तत्कालीन भारतीय कर्णधार सौरव गांगुली म्हणाला, “मी अभिजीत काळे याला फार आधीपासून ओळखत आहे. तो असे करू शकतो असे मला वाटत नाही. मी यावर विश्वास ठेवू शकत नाही. ”
दुसऱ्या दिवशी, बीसीसीआयचे प्रमुख जगमोहन दालमिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अभिजीत काळे याला या प्रकरणातील चौकशी संपेपर्यंत क्रिकेट खेळण्यापासून निलंबित करण्यात आले आहे.
२५ नोव्हेंबर २००३ रोजी काळेने बीसीसीआयविरोधात जिल्हा दिवाणी न्यायालयात, पुणे येथे अर्ज दाखल केला. त्याची विनंती अशी होती की, चौकशी पूर्ण होईपर्यंत खेळाडूला निलंबित करणे घटनाबाह्य आहे आणि त्या अर्थाने मला खेळायला परवानगी देण्यात यावी.
२८ नोव्हेंबर रोजी, पुणे कोर्टाने अभिजीतच्या याचिकेवर सांगितले की, चौकशी संपल्याशिवाय खेळाडूला निलंबित केले जाऊ नये. अशा प्रकारे अभिजीतला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळायला परवानगी मिळाली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणाले की, अभिजितला खेळायला कोर्टाने परवानगी दिली असल्याने सर्वांना कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे लागेल.
३० नोव्हेंबर रोजी पुण्याच्या जिल्हा कोर्टाने अभिजीतवर दिलेला निकाल फिरवला. बीसीसीआयने २८ नोव्हेंबरच्या निर्णयाविरोधात कोर्टात अपील केले. अभिजीतवर पुन्हा बंदी घातली गेली.
डीव्ही सुब्बाराव यांनी या प्रकरणाची चौकशी केली आणि त्याचा अहवाल बीसीसीआयकडे पाठविला जो शिस्त समितीकडे जाणार होता. या चौकशीत अभिजीत काळेविरुद्ध प्राथमिक पुरावे सापडले आहेत, यामुळे आपल्याला अधिक खोलीत जाऊन तपास लागेल, असे नमूद केले होते. या चौकशी अहवालात सांगितले होते की, अभिजीतने किरण मोरे यांना आधी फोनवरून दहा लाख रुपयांची ऑफर दिली होती आणि जून-जुलैमध्ये हे घडले. काळे यांच्या वकिलांनी असे सांगितले की, काळे याने निवडकर्त्यांना फक्त त्याच्या खांद्याची दुखापत ठीक झाल्याचे सांगण्यासाठी हा फोन लावला होता आणि तो संघात समाविष्ट होण्यासाठी तंदुरुस्त आहे. याशिवाय काळे यांनी प्रणव रॉय यांना 5 वेळा फोन केला होता आणि एकदा मुंबई विमानतळावरही भेट घेतली होती, असेही या वृत्तावरून कळले.
या अहवालाद्वारेच मोरे यांच्या म्हणण्यानुसार, काळेची आई बडोद्यात त्याच्या घरी गेली आणि मोरेच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नीशी बोलली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काळे यांच्याविरोधात चौकशी सुरू करणारी एक समिती गठित केली. दुसर्या आठवड्यात अभिजीतविरूद्ध कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, त्याला उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. २० डिसेंबर रोजी अभिजीत काळे म्हणाला की, मी मोरे यांच्याशी १ ऑगस्टला अखेरचा बोललो होतो, तर १८ नोव्हेंबरला प्रणव रॉय यांना फोन केला होता, पण हा कॉल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष थोरवे यांच्या समोर करण्यात आला होता.
१५ में २००४ रोजी या प्रकरणात एक मोठे काम केले गेले. ९ तासांची एक मॅरेथॉन सुनावणी जगमोहन दालमिया यांच्या उपस्थितीत झाली. अभिजीत काळे शिस्तपालन समितीसमोर बसला होता. एकामागून एक साक्षीदार आणले जात होते. प्रणव रॉयचा मित्र राजीव गुप्ता आला आणि त्याने सांगितले की, त्याच्या उपस्थितीत अभिजीतने मुंबई विमानतळावर लाच देण्याविषयी बोलले होते. याशिवाय किरण मोरे यांची पत्नी रावी म्हणाली की, अभिजीतची आई त्याच्या घरी आली होती आणि त्यांनी सांगितले की, मोरे यांनी अभिजीतला संघात स्थान मिळवून द्यावे अन्यथा अभिजीत आत्महत्या करेल. या सुनावणीदरम्यान अभिजीत खूप रडला. नंतर, काळेने आपला गुन्हा कबूल केल्याची बातमी वर्तमानपत्रात आली होती, अभिजित काळेने तातडीने ही गोष्ट खोटी असल्याचे घोषित केले.
या प्रकरणानंतर भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आला. अनेक युवा खेळाडू तसेच देशांतर्गत क्रिकेटमधील बऱ्याच खेळाडूंनी आपल्याला अनेकदा वेगवेगळ्या स्तरावर निवडकर्त्यांनी पैसे मागितले गेल्याचे आरोप केले.
२००३ मध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव एकदिवसीय सामन्यानंतर अभिजीत काळे भारतीय संघाकडून कधीही खेळला नाही. बंदी घातल्यानंतर त्याने एका मुलाखतीत सांगितले की, निवड समितीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला होता पण कुठेही पैशांची चर्चा नव्हती. मोरे व रॉय यांना सहजपणे सोडण्यात आले, असा त्यांचा विश्वास होता.
२००९ मध्ये अभिजीत काळे इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला. तिथे एका स्थानिक क्लबसाठी खेळताना त्याने एकाच षटकात ३९ धावा फटकावल्या. यामध्ये सलग सहा षटकारांचा समावेश होता. सध्या त्याचे वय ४७ वर्ष असून तो शेवटचा प्रथम श्रेणी सामना २००६ साली त्रिपुराकडून खेळला. २०१९ मध्ये अभिजीत काळे याची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवड समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.