१९७० मध्ये वर्णद्वेषाच्या कारणामुळे द. आफ्रिकेला २२ वर्षासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले होते. क्रिकेटची महान परंपरा असलेल्या द. आफ्रिकेत या निर्णयामुळे खळबळ माजली. ग्रीम पोलॉक, पीटर पोलॉक, बॅरी रिचर्ड्स, माइक प्रॉक्टर यांसारख्या दर्जेदार खेळाडूंची कारकीर्द या निलंबनामुळे समाप्त झाली होती. १९९१ मध्ये जेव्हा द. आफ्रिकेवरील बंदी उठवण्यात आली तेव्हा एका यष्टिरक्षक फलंदाजाने द. आफ्रिका संघात कायमस्वरूपी आपली जागा बनवली. याच द. आफ्रिकेचे यशस्वी यष्टिरक्षक ते आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इथपर्यंत प्रवास करणारे डेव्ह रिचर्डसन यांचा आज वाढदिवस.
रिचर्डसन यांचे वडील जॉन हे २२ प्रथमश्रेणी सामने खेळले होते. रिचर्डसन यांना आपल्या वडिलांकडूनच क्रिकेटचे बाळकडू मिळाले. रिचर्डसन व त्यांचा लहान भाऊ राल्फ वडिलांच्या निगराणीखाली क्रिकेटचे धडे गिरवत. इस्टन प्रोविन्स या प्रथमश्रेणी संघाचे त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली.
१९८० च्या दशकात, रे जेनिंग्ज हे द. आफ्रिकेचे पहिल्या पसंतीचे यष्टीरक्षक होते. १९८३-८४ मध्ये जेंनिंग्ज दुखापतग्रस्त असल्याने रिचर्डसन यांना वेस्ट इंडीज बोर्डाशी बंडखोरी केलेल्या संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. १९८६ मध्ये किम ह्युज नेतृत्व करत असलेल्या बंडखोर ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्यांनी खऱ्या अर्थाने जेनिंग्ज यांना हटवून द. आफ्रिका संघातील यष्टीरक्षकाची जागा आपल्या नावे केली. १९९१ मध्ये द. आफ्रिका संघावरील बंदी उठल्यानंतर कोलकात्यातील भारताविरुद्ध झालेल्या पुनरागमनाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिचर्डसन यांनी द. आफ्रिकेसाठी यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली.
१९९२ विश्वचषकातील उपांत्य सामन्यात ज्यावेळी डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे, द. आफ्रिकेला एका चेंडूत २२ धावांचे अशक्यप्राय आव्हान देण्यात आले, त्यावेळी रिचर्डसन दुसर्या टोकावर फलंदाजी करत होते. २२ वर्षाच्या निलंबनानंतर परत आलेल्या संघाने, ज्याप्रकारे हिमतीने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली, त्यामध्ये रिचर्डसन यांचा वरिष्ठ खेळाडू म्हणून महत्त्वाचा सहभाग होता.
रिचर्डसन यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच फॅनी डिव्हिलियर्स, शॉन पोलॉक, ब्रेट शूट, लान्स क्लुसनर यासारख्या गोलंदाजांच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक केले. पहिल्यापासून वेगवान गोलंदाजांविरुद्ध यष्टीरक्षण करण्याची सवय असल्याने, रिचर्डसन यांना फिरकी गोलंदाजांसमोर यष्टीरक्षण करताना अडचणी येत. त्यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत १५० झेल घेतले मात्र अवघे दोन फलंदाज यष्टीचीत करण्यात त्यांना यश आले.
द. आफ्रिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत आल्यानंतर, रिचर्डसन एकमेव असे खेळाडू होते ज्यांनी सलग ३८ कसोटी सामने खेळले. १९९६ मध्ये मार्क बाऊचरने पदार्पण केल्यानंतर ते फक्त ४ कसोटी खेळू शकले. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्यांनी ४२ सामने खेळत, एका शतकासह १,३५९ धावा काढल्या. १९९४-९५ च्या न्यूझीलंड दौऱ्यात त्यांनी कारकिर्दीतील एकमेव मालिकावीर किताब पटकावला होता.
रिचर्डसन हे जागतिक क्रिकेटमधील एक कमनशिबी खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात. १२२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्यांना एकदाही शतकाची वेस ओलांडता आली नाही. त्यांची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ५३ राहिली. या १२२ सामन्यात दुर्दैवाने त्यांना एकही सामनावीराचा पुरस्कार मिळाला नाही. त्यांचा हा नकोसा विक्रम पुढे भारताच्या नयन मोंगियाच्या नावे जमा झाला, ज्याला १५६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांनंतरही सामनावीर पुरस्कार मिळू शकला नव्हता.
१९९८ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, रिचर्डसन यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. व्यवसायिक वकील असलेले रिचर्डसन, ऑक्टागॉन साऊथ आफ्रिका यांच्यासाठी व्यवस्थापक म्हणून काम पाहत. त्यांच्याकडे, द. आफ्रिकन क्रिकेटपटू व द. आफ्रिका क्रिकेट बोर्ड यांच्या दरम्यान समन्वय साधण्याचे काम देण्यात आले होते. २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पहिले व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची निवड करण्यात आली. २०१२-२०१९ यादरम्यान त्यांनी आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी अत्यंत निग्रहपूर्वक पार पाडली.
आपल्या सनहॅट व तपकिरी ग्लोव्हजसाठी प्रसिद्ध झालेल्या डेव्ह रिचर्डसन यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!!!
ट्रेंडिंग लेख-
सर्व चौकटी मोडून जगात क्रिकेट समालोचनाचा आदर्श घालून देणारी नेरोली मिडोज